Anger at the Zilla Parishad | जिल्हा परिषदेमध्ये संताप
जिल्हा परिषदेमध्ये संताप

ठळक मुद्देस्थायी समिती : सभेची नोटीसच नाही, प्रश्नही सुटत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सदस्यांनी सभेची नोटीस न मिळाल्याबद्दल संताप व्यक्त केला. काही सदस्यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले.
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची सभा पार पडली. या सभेत पंकज मुडे यांनी सभेची नोटीसच मिळाली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. जया पोटे यांनी सातत्याने समस्या मांडूनही त्या सुटत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. वर्षभरापासून मुद्दा उपस्थित करूनही प्रशासनाकडून अनुपालन मिळत नसल्याबद्दल त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अध्यक्षांनी सर्व सदस्यांना तातडीने अनुपालन देण्याचे निर्देश दिले. स्थायी समिती सदस्यांनाच अनुपालन मिळत नसेल तर सामान्य सदस्यांचे काय, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. सर्वसामान्य सदस्यांना तीन महिन्यानंतर सर्वसाधारण सभेत प्रश्न मांडण्याची संधी मिळते. आमचेच प्रश्न सुटत नसतील तर सामान्य सदस्यांनी कुणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न सदस्यांनी विचारला.
सभेत ११ ते ३० सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत माहिती देण्यात आली. आसोला येथे आतापर्यंत किडणीच्या आजाराने २० जण दगावले. त्यानंतरही माणिकवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तेथे जात नसल्याबद्दल संताप व्यक्त केला. मंगला पावडे यांनी अनेक गावांमध्ये अस्वच्छता असून ग्रामपंचायत त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला.
तेजापूर येथे डॉक्टर नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. समस्या सुटत नसल्याने लोकं आम्हाला जोडे मारतील, असा संताप त्यांनी व्यक्त केला. पेसा ग्रामपंचायतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी येतो. मात्र त्याचे योग्य नियोजन होत नसल्याने अनेक ठिकाणी अफरातफर होते. त्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली.

आता व्हॅटस्अ‍ॅपवर चालणार कामकाज
सभेत स्थायी समिती सदस्यांचा व संबंधित अधिकाऱ्यांचा व्हॅटस्अ‍ॅप ग्रुप स्थापन करण्याची संकल्पना समोर आली. त्यावर सदस्यांना उत्तरे दिली जाणार आहे. यामुळे यापुढे स्थायी समितीचे कामकाज व्हॅटस्अ‍ॅप ग्रुपवर चालणार आहे. मात्र अनेक सदस्य दुर्गम भागात वास्तव्याला असतात. तेथे नेटसेवा उपलब्ध नसल्याने या ग्रुपचा फज्जा उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सभेत ४६१ अधिक २६७ गावांमध्ये स्मशानभूमी शेड बांधण्यावरह चर्चा झाली. संबंधित ग्रामपंचायतींना तीन लाख ६५ हजार रुपयात शेड बांधण्याचे निर्देश दिले जाणार आहे. तसेच पंचायत समितीची आठ वाहने निर्लेखित करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला. मात्र जबाबदार पदाधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे शिक्षकांच्या समुपदेशनाच्या बाबीवर चुप्पी साधली.

Web Title: Anger at the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.