अंधरवाडी अद्याप अंधारातच
By Admin | Updated: November 27, 2014 23:43 IST2014-11-27T23:43:04+5:302014-11-27T23:43:04+5:30
पाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला

अंधरवाडी अद्याप अंधारातच
नीलेश यमसनवार - पाटणबोरी
पाटणबोरीपासून अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावरील अंधरवाडी हे गाव अद्यापही अंधारातच चाचपडत आहे. टिपेश्वर अभयारण्याच्या बाजूला आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले या गावाला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही साधा रस्ता मिळाला नाही.
पाटणबोरी येथून पश्चिमेस साडे तीन किलोमीटर अंतरावरील १०० टक्के आदिवासी व गोरगरीब बांधव वास्तव्य करणाऱ्या अंधरवाडीत ५० घरांची वस्ती आहे. त्यात २७५ ते ३00 ग्रामस्थ वास्तव्य करतात. या गावाला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. निसर्गाच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. मात्र विकासाचा सूर्य या गावात अद्याप पोहोचलाच नाही. विकासाची किरणे कधी उगवलीच नाही. स्वातंत्र्याच्या तब्बल ६७ वर्षानंतरही या इवलाशा गावाला साधा रस्ता नाही़ परिणामी तेथील गावकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करीत जीवन कंठावे लागत आहे.
या गावाला धड रस्ता नसल्याने पावसाळ्यात तर ग्रामस्थ भंडावून जातात. त्यांची प्रचंड तारांबळ उडते. विशेषत: पावसाळ्यात कुणी आजारी पडल्यास त्याला दवाखान्यापर्यंत तरी नेता येईल किंवा नाही, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकतो. कारण पावसाळ्यात या गावाला असलेल्या सध्याच्या रस्त्यावर दोन ते तीन फूट चिखल साचतो. तो चिखल तुडवित ग्रामस्थांना पुढची वाट शोधावी लागते. त्यामुळे त्यांची प्रचंड परवड होते. तथापि या गावाला रस्ता तयार करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर उदासीनताच दाखविली जाते.
या छोटाश्या गावात केवळ रस्ताच नाही, तर शाळाही नाही, पाणी पुरवठा योजनाही नाही. सर्वच बाबतीत हे गाव मागासलेले आहे. आदिवासी बांधवांसाठी शासन विविध योजना आखते. त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी भरपूर निधी उपलब्ध करून देते. प्रत्यक्षात हा निधी, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे या गावावरून दिसून येते. परिणामी हा निधी, योजना कुठे जातात, असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे त्यांनाही वाटते. या लहान गावाकडे कुणाचेच लक्ष नाही. त्यामुळे तेथील ग्रामस्थ अद्यापही गावात विकासाचा सूर्य कधी उगवेल, याच विवंचनेत आहे. शासनाने किमान रस्ता द्यावा, गावात शुद्ध पाणी पुरवठ्याची व्यवस्था करावी, एवढ्याच त्यांच्या माफक अपेक्षा आहेत.
मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही कोणत्याच शासनाला त्या पूर्ण करता आल्या नाहीत. विशेष म्हणजे केळापूर-आर्णी हा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असताना गावाची फरफट सुरूच आहे.