अन् जगणे सुसह्य झाले
By Admin | Updated: June 30, 2014 00:09 IST2014-06-30T00:09:27+5:302014-06-30T00:09:27+5:30
शरीर धर्मानुसार इतर व्याधींप्रमाणेच कुणालाही कोणत्याही वयात कॅन्सर होवू शकतो. कॅन्सरबद्दल अनेक गैरसमज असल्याने कॅन्सर म्हणजे मृत्यूच असे समीकरण झाले आहे. आज विज्ञानाने

अन् जगणे सुसह्य झाले
कॅन्सरग्रस्तांची यशोगाथा : प्रयास-सेवांकुरचा अभिनव उपक्रम
यवतमाळ : शरीर धर्मानुसार इतर व्याधींप्रमाणेच कुणालाही कोणत्याही वयात कॅन्सर होवू शकतो. कॅन्सरबद्दल अनेक गैरसमज असल्याने कॅन्सर म्हणजे मृत्यूच असे समीकरण झाले आहे. आज विज्ञानाने नवनवीन उपाय आणि औषधोपचार शोधला आहे. प्रारंभीच्या काळात कॅन्सरचे निदान झाले तर कॅन्सर बरा होऊन दीर्घायुष्य जगता येते. त्यासाठी औषधीबरोबरच दैनंदिन जीवनातील कार्य, सकारात्मक दृष्टिकोन, आहार आणि संघर्षाची तयारी ठेवावी लागते.
आयुष्य बिघडविणारा आणि बदलविणारा कॅन्सर कुटुंबाच्या मानसिक आधाराने जगण्याची उमेद देतो. प्रयास-सेवांकुर अमरावती-यवतमाळच्यावतीने आयोजित डॉ.अविनाश सावजी यांच्या स्वप्नवेड्या माणसांशी प्रेरणादायी संवादाचा मासिक कार्यक्रम नुकताच महेश भवन येथे पार पडला. कॅन्सर झालेल्या काही डॉक्टर आणि इतर रुग्णांच्या जीवनातील संघर्षगाथा उलगडून दाखविणारा हा प्रेरणादायी कार्यक्रम होता.
‘आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना।’ या संत तुकारामांच्या अभंगाला प्रा.राहुल एकबोटे यांनी स्वरबद्ध केले होते. त्यानंतर डॉ.महामुने यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विषद केली. कॅन्सरबाबतचा स्लाईड शो, रोग निदान आणि उपचार या बाबत डॉ.विजय कावलकर यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर डॉ.सावजींनी सर्वप्रथम निवृत्त शिक्षिका शिला वासुदेव कांबळे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या कॅन्सरचे निदान होवून उपचार सुरू असलेल्याला फक्त एक वर्ष झाले. त्यामुळे शिलातार्इंनी आज आपण आपल्या कॅन्सरचा वाढदिवस साजरा करीत आहो, असे हसत-खेळत सांगितले.
डॉ.सुरेश मुडे यांना १७ वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यावेळी त्यांच्या निरक्षर आईने त्यांना हिम्मत दिली. कामात व्यस्त राहण्याचा सल्ला दिला. पौष्टिक आहार देवून नकारात्मक विचारांपासून दूर ठेवले. त्यानंतर त्यांची बायपास सर्जरी झाली. पुन्हा एकदा अॅन्जिओप्लास्टी झाली. तरीदेखील आज ते समाधानी आयुष्य जगत आहेत. जीवतराम कटियारा यांना ३० वर्षांपूर्वी धूम्रमापानामुळे घशाचा कॅन्सर झाला होता. योग्य उपचारामुळे आज सत्तरीमध्ये असलेले जीवतराम निरोगी आयुष्य जगत आहे.
नागपूरच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.निर्मला वझे यांची जीवनगाथा विलषण आहे. त्यांच्या कुटुंबातील १५ स्त्रियांना वारसाहक्काने कॅन्सर मिळाला आहे. २७ वर्षांपूर्वी निर्मला वझे यांच्या आजाराचे निदान झाले. त्यापूर्वी त्यांच्या बहिणीचे निधन झाले होते. त्यांच्या विवाहित मुलीलाही लग्नानंतर एकाच महिन्यात कॅन्सरचे निदान झाले. तरीही त्या डगमगल्या नाहीत. ज्या आजाराचे आपण बळी आहोत त्या आजाराबाबत जनजागृती करण्यास त्यांनी गेल्या २५ वर्षांपूर्वी प्रारंभ केला. अनेक महिलांना तपासून योग्य उपचारासाठी पाठविले आहे. आजार लपवू नका, कुटुंबातून आधार मिळावा, आजारासाठी भोग मानू नका, नियमित तपासणी करा आदी उपयुक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या. संचालन प्रा.घनश्याम दरणे यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील नागरिकांची उपस्थिती होती. (सांस्कृतिक प्रतिनिधी)