संरक्षित वनक्षेत्रात नांगर

By Admin | Updated: December 9, 2014 22:57 IST2014-12-09T22:57:20+5:302014-12-09T22:57:20+5:30

एरव्ही सामान्य माणसाने जंगलात प्रवेश केला तरी त्याला नियम सांगणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने यवतमाळ वनवृत्तात शेकडो हेक्टर वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे.

Anchor in protected forest area | संरक्षित वनक्षेत्रात नांगर

संरक्षित वनक्षेत्रात नांगर

वनप्रशासन मेहेरबान : शेकडो हेक्टर जंगलात अतिक्रमण
यवतमाळ : एरव्ही सामान्य माणसाने जंगलात प्रवेश केला तरी त्याला नियम सांगणाऱ्या वन अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीने यवतमाळ वनवृत्तात शेकडो हेक्टर वन जमिनीवर शेतीसाठी अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणासाठी आधी सागवान व आडजात वृक्षांच्या हजारो झाडांची राजरोसपणे कत्तलही करण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांच्या साक्षीने सुरू असलेला हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला.
यवतमाळ वनवृत्तांतर्गत अकोला, पुसद, यवतमाळ व पांढरकवडा हे चार वन विभाग आहेत. त्याअंतर्गत ३१ वनपरिक्षेत्र, १११ वनवर्तूळ आणि ५५९ बीट आहेत. त्यापैकी २५ टक्के बीटमध्ये अतिक्रमण करण्यात आले आहे. यवतमाळ वनवृत्ताचे क्षेत्र २ लाख ९२ हजार ८४९.९५ हेक्टर एवढे आहे. वनाचे कायदे कठोर आहेत. संरक्षित वन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा असेल तरी संबंधित वन विभाग प्रमुखांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. वन खात्याच्या परवानगीशिवाय जंगलांमध्ये मानवी प्रवेश होऊ शकत नाही. तसा प्रयत्न झाल्यास भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई होते. वन खात्याचे अधिकारी सामान्य माणसाला या अधिनियमातील तरतुदीचे वेळोवेळी स्मरण करून देताना दिसतात. तर दुसरीकडे याच वन अधिकाऱ्यांच्या डोळ्यात देखत चक्क संरक्षित वन क्षेत्रात शेकडो हेक्टरमध्ये शेतीसाठी अतिक्रमण केले जात असल्याची अनेक प्रकरणे वनवृत्तात पहायला मिळतात. त्यात सर्वाधिक अतिक्रमण हे पांढकवडा आणि यवतमाळ वन विभागात असल्याची माहिती आहे. त्यातही जोडमोहा, वडगाव व घाटंजी वनपरिक्षेत्रात हे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहेत.
जंगलांना लागून अनेक गावे, वस्त्या आहेत. याच वस्त्यांमधील लोक वनांमध्ये अतिक्रमण करीत आहे. या अतिक्रमणासाठी आधी या जंगलातील सागवान व आडजात वृक्षांची अनधिकृतरीत्या तोड केली जाते. त्यानंतर त्या जमिनीवर वखर, नांगर फिरवून बियाण्यांची पेरणी केली जाते. शासनाच्या या जमिनीवर कृषी उत्पन्न घेण्याचा सपाटा वन वृत्तात सुरू आहे. मात्र त्याला वन विभागाकडून कोणतीही आडकाठी केली जात नाही. पाहता पाहता शेकडो हेक्टर जंगल अतिक्रमणधारकांनी आपल्या ताब्यात घेतले आहे. वनवृत्तात सुमारे दहा टक्के क्षेत्र अतिक्रमणधारकांच्या घशात अडकल्याचे सांगितले जाते. जोडमोहा वनपरिक्षेत्रात कक्ष क्र. २४५, ३६५, ३६८, ३२६ यामध्ये शेकडो हेक्टर वन जमिनीवर अतिक्रमण केले गेले आहे. वडगाव व आर्णी वन परिक्षेत्रातही जंगल नष्ट करून अतिक्रमण झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Anchor in protected forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.