शिवसेनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर टाच
By Admin | Updated: December 29, 2014 23:51 IST2014-12-29T23:51:15+5:302014-12-29T23:51:15+5:30
विधानसभा निवडणुकीदरम्यान काय चुका झाल्या, कुठे कमी पडलो याचे चिंतन करून निष्क्रिय शिवसेना पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्याचा इशारा पालकमंत्री तथा शिवसेना जिल्हा प्

शिवसेनेतील निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर टाच
यवतमाळ : विधानसभा निवडणुकीदरम्यान काय चुका झाल्या, कुठे कमी पडलो याचे चिंतन करून निष्क्रिय शिवसेना पदाधिकाऱ्यांना डच्चू देण्याचा इशारा पालकमंत्री तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय राठोड यांनी येथे पक्षाच्या बैठकीत दिला.
येथील विश्रामगृहात शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन वाढविणे, जनसामान्यांच्या प्रश्नाबाबत पदाधिकाऱ्यांनी कोणती भुमिका ठेवावी आदी महत्त्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. तालुकास्तरावरच्या निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना लवकरच पदावरून काढण्यात येणार आहे. त्यांच्या जागेवर काम करणाऱ्या शिवसैनिकांना संधी मिळणार आहे. शिवसेनेच्या गावनिहाय शाखांची स्थिती पाहुन पुन्हा बांधणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पक्षाला अनेक वर्षानंतर सत्तेत बसण्याची संधी मिळाली. आजपर्यंत विरोधक म्हणून असेलेली भूमिका शिवसेना पदाधिकाऱ्यांना बदलवावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. आता शिवसैनिकांवर सत्ताधारी म्हणून दुहेरी भुमिका आहे. शिवसेनेला जिल्ह्यात पालकमंत्री पद मिळाले आहे.
ही एक संधी असून त्याचा पक्ष संघटनेसोबत जनसामान्यांची कामे काढण्यासाठी कसा वापर करावा याचा कानमंत्र बैठकीत देण्यात आला. आता पुर्वीप्रमाणे शिवसेना स्टाईल वापरण्याऐवजी सत्ताधारी म्हणून काम करून घेण्याची भूमिका पार पाडावी लागणार आहे. जिल्ह्यात अनेक समस्या असून प्रत्येकाने कामाला लागल्यास खऱ्या अर्थाने सत्तेत आल्याचा फायादा होईल असेही ना. संजय राठोड यांनी बैठकीत सांगितले.
बैठकीला माजी आमदार विश्वास नांदेकर, बाळासाहेब मुनगीनवार, संतोष ढवळे, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हा प्रमख राजेंद्र गायकवाड, किशोर इंगळे, गजानन डोमाळे, बाबू पाटील जैत, परमानंद अग्रवाल, गजानन बेजंकीवार, उमाकांत पापीनवार यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते. दीर्घ काळ चाललेल्या या बैठकीत सर्वच मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. (कार्यालय प्रतिनिधी)