आनंदनगर झाले महिलांच्या निर्धारातून आनंदी

By Admin | Updated: October 26, 2014 22:46 IST2014-10-26T22:46:46+5:302014-10-26T22:46:46+5:30

गावाचे नाव आनंदनगर. मात्र गावात दारुचा महापूर. दररोज गावात भांडण-तंटे. रस्त्यावर झिंगणारे दारूडे. चार वर्षांपूर्वी गावाचे असे चित्र होते. मात्र दारूमुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या एका महिलेने

Anandnagar becomes happy with the determination of women | आनंदनगर झाले महिलांच्या निर्धारातून आनंदी

आनंदनगर झाले महिलांच्या निर्धारातून आनंदी

विजय बोंपीलवार - हिवरासंगम
गावाचे नाव आनंदनगर. मात्र गावात दारुचा महापूर. दररोज गावात भांडण-तंटे. रस्त्यावर झिंगणारे दारूडे. चार वर्षांपूर्वी गावाचे असे चित्र होते. मात्र दारूमुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या एका महिलेने पुढाकार घेतला. गावातील महिलांच्या सहकार्याने अख्खे गाव दारूपासून मुक्त केले. आनंदनगर महिलांच्या निर्धारातून आनंदी झाले. चार वर्षापूर्वी दारूत झिंगणारे आता हरिपाठात दंग होऊ लागले.
महागाव तालुक्यातील आनंदनगर हे अडीच ते तीन हजार लोकसंख्येचे गाव. काही वर्षापूर्वी नावाप्रमाणेच गाव आनंदी होते. परंतु या गावात दारू शिरली. व्यसनांनी अनेकांना आपल्या कवेत घेतले. लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण दारूमध्ये झिंगू लागले. दारूसोबतच गांजा, मटका, जुगार अड्डेही सुरू झाले. छोट्याशा गावात ७० ते ८० दारू भट्ट्या सुरू होत्या. आजूबाजूच्या गावातील दारूडेही या गावात यायचे. दारूमुळे गावात घरोघरी भांडणे, रस्त्यावर झिंगून पडलेले दारूडे असे दृश्य असायचे. या सर्वांचा त्रास महिलांना असायचा.
दारूचा अतिरेक झाला. गावातील दत्तात्रय जामकर या सात्विक स्वभावाच्या तरुणाला दारूने सोडले नाही. अतिमद्यसेवनात त्याचा मृत्यू झाला. त्याच कुटुंबातील दिलीप जामकरनेही दारूच्या नशेत स्वत:ला संपविले. दिलीपचा भाऊ रमेशचाही दारूच्या आहारी जाऊन अपघाती मृत्यू झाला. तिघांच्या मरणाने हसते खेळते कुटुंब उघड्यावर आले. रमेश व दिलीपच्या पत्नीला तरुण पणातच वैध्वय आले. मात्र परिस्थितीवर खचून न जाता दिलीपची पत्नी बेबीताईने गावातून दारू हद्दपार करण्याचा निर्धार घेतला. गल्लोगल्लीत असलेल्या दारूड्यांपुढे एकटी महिला काय करणार असा सर्व गावाला प्रश्न पडला. परंतु तिने हार मानली नाही. गाव दारूमुक्त व्हावे म्हणून महिला मंडळ स्थापन करण्याचे ठरविले. गावातील प्रतिष्ठीतांच्या भेटी घेतल्या. आपला मनोदय सांगितला. त्यानंतर गावातील व्यसनाधीन पतीच्या बायकांना एकत्र केले. महिलांचे जगदंबा मंडळ स्थापन केले. महागाव पोलिसांना याबाबीची माहिती दिली. पोलिसांनीही त्यांना साथ दिली. पोलिसांनी दारू भट्ट्यांवर धाडी टाकणे सुरू केले. दारूड्यांवर गुन्हे दाखल करण्यात येऊ लागले. आता या गावात दारूचा थेंबही मिळत नाही. काही दारूडे बाहेरगावहून गुपचुप दारू पिऊन येतात. परंतु रस्त्यावर कोणताच धिंगाना दिसत नाही. दारू हद्दपार झाल्याने महिलांचे मनोबल वाढले. त्यांनी गावात हनुमान मंदिर स्थापन्याचा निर्णय घेतला. नागपूरवरून हनुमानाची मूर्ती आणून प्रतिष्ठापणा केली. या मंदिरात दररोज सायंकाळी हरिपाठ होतो. दररोज गावातील २५ ते ३० लोक हरिपाठाला हजर असतात. यासाठी त्यांना विलास कवाणे, सो.फू.राठोड, मंगल कारभारी, दत्तराव पवार, पंडित पवार, काशीराम राठोड, भगवान पवार, सीताराम आडे, रोडूसिंग राठोड, अमोल जामकर, सतवाराव जाधव यांनी सहकार्य केले.

Web Title: Anandnagar becomes happy with the determination of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.