अमृताच्या अदांनी ‘वाजले की बारा’

By Admin | Updated: January 29, 2015 23:14 IST2015-01-29T23:14:42+5:302015-01-29T23:14:42+5:30

ती माईकवर आली... काय राव काय म्हणता... शब्द उच्चारताच एकच जल्लोष झाला... विद्यार्थ्यांचा आग्रह... तोही नृत्याचा... काही क्षण स्तब्ध... क्षणातच ती स्टेजच्या मधोमध आली...

Amrita 'Ad | अमृताच्या अदांनी ‘वाजले की बारा’

अमृताच्या अदांनी ‘वाजले की बारा’

‘जेडीआयईटी’चे युफोरिया-१५’ : जितेंद्रची फटके‘बाजी’ तर श्रेयसचा सल्ला
यवतमाळ : ती माईकवर आली... काय राव काय म्हणता... शब्द उच्चारताच एकच जल्लोष झाला... विद्यार्थ्यांचा आग्रह... तोही नृत्याचा... काही क्षण स्तब्ध... क्षणातच ती स्टेजच्या मधोमध आली... आणि सुरू झाले लावणी नृत्य... ‘आता वाजले की बारा’... जिन्स पँट आणि शर्ट घातलेल्या अमृताने दिलखेच नृत्य करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
निमित्त होते जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘युफोरिया-१५’ या स्नेहसंमेलनाचे. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर, चित्रपट अभिनेता व निर्माता श्रेयस तळपदे, आणि हरहुन्नरी कलावंत जितेंद्र जोशी यांनी स्नेहसंमेलनाच्या तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांसोबत धमाल केली. ‘आता वाजले की बारा’ या लावणीने घराघरात पोहोचलेल्या अमृताला नृत्याचा आग्रह झाला नसता तर नवलच. विद्यार्थ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात अमृताचे स्वागत करत लावणी नृत्याचा आग्रह धरला.
हो-नाही करत ती एकदाची तयार झाली आणि तिची पावले मग थांबलीच नाहीत. ‘फॅशन शो’साठी तयार केलेल्या निमुळत्या रॅम्पवर तिच्या पदलालित्याने सर्वजण भारावून गेले. ‘आता वाजले की बारा’ या लावणीची साईन ट्यून सुरू झाली तेव्हा तिची मोहक अदा विद्यार्थी डोळ्यात साठवून घेत होते. काही कळायच्या आतच नृत्य करत अमृता चक्क स्टेजच्या खाली उतरली आणि विद्यार्थ्यांमध्ये शिरून नृत्य करायला लागली. तेवढ्याच उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनीही तिच्यासोबत ठेका धरला. विशेष म्हणजे, अमृताला आदल्या दिवशी ताप आला होता. प्रकृती ठीक नसतानाही विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव तिने ठेकाच धरला नाही तर अख्खी लावणी आपल्या नृत्याने जिवंत केली.
या लावणीनंतर जितेंद्र जोशी माईकवर आला. ‘पोट्टी अशी नाचून राह्यली की मले वाटलं आता फायर ब्रिगेडच बोलवावं लागल’ असे म्हणताच पुन्हा टाळ्या आणि शिट्ट्या सुरू झाल्या. अमृताला लाख रुपये जरी कुणी दिले तरी ती अशी स्टेजवर नाचली नसती. मात्र तुमचा उत्साह पाहून तिलाही राहावले नाही, असे जितेंद्र म्हणाला. ‘मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाव्हणे’ हा संवाद जितेंद्रने सादर करून आगामी ‘बाजी’ चित्रपटाबद्दल सांगितले. ‘बाजी’ चित्रपटात श्रेयस तळपदे यांनी डुप्लिकेटचा वापर न करता घोड्यावरून रपेट मारतानाचे दृश्य चित्रित करताना घडलेला प्रसंग सांगितला. या चित्रपटात जितेंद्र खलनायक मार्तंडची भूमिका वठवित आहे. या चित्रपट निर्मितीत आलेल्या गमतीजमती सांगतानाच जितेंद्रचा मोठेपणाही दिसून आला. सदर महाविद्यालयातील मंगेश सावळकर या विद्यार्थ्याची ‘सिग्नेट’ या स्मरणिकेतील ‘ऐश्वर्या आली भेटाले’ ही कविता संपूर्ण वाचून दाखविली. एवढेच नाही तर त्याचे कौतुक करीत प्रत्येक क्षेत्रात एक ‘बाजी’ असतो आणि तो ओळखला पाहिजे, असेही सांगितले. ‘हंबरून वासराले चाटते जवा गाय’ ही कविता सादर केली तेव्हा संपूर्ण वातावरण धीरगंभीर झाले होते.
श्रेयस तळपदे म्हणाला, विद्यार्थ्यांच्या जीवनात महाविद्यालयीन शिक्षण महत्त्वाचे असते. तुमचा उत्साह पाहूण आपण उगाचच पासआऊट झालो असे वाटते, नाहीतर याच महाविद्यालयात शिकायला आलो असतो. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर संधी ओळखली पाहिजे. त्या संधीचे सोने केले पाहिजे, विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचाही मोठा सहभाग असतो, असे सांगितले. ‘आपल्याशी नडेल तो नरकात शिरेल’ हा आगामी ‘बाजी’ चित्रपटातील संवाद म्हणत त्याने विद्यार्थ्यांचा निरोप घेतला. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Amrita 'Ad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.