आमदाराचे घर यवतमाळात तिजोरीची चावी मात्र मुंबईत !
By Admin | Updated: June 26, 2014 00:01 IST2014-06-26T00:01:11+5:302014-06-26T00:01:11+5:30
लोकसभा निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून मिरविणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांचे घर यवतमाळात असले तरी त्यांनी आपल्या शासकीय निधीच्या तिजोरीची चाबी मुंबईच्या

आमदाराचे घर यवतमाळात तिजोरीची चावी मात्र मुंबईत !
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत ‘स्टार प्रचारक’ म्हणून मिरविणारे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांचे घर यवतमाळात असले तरी त्यांनी आपल्या शासकीय निधीच्या तिजोरीची चाबी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवली आहे.
येथील सर्वच आमदारांनी आपला नोडल जिल्हा यवतमाळ घोषित केला आहे. खासदारांनीही यवतमाळलाच पसंती दिली. अर्थात या खासदार-आमदारांच्या शासकीय निधीचे अधिकार यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत. या परंपरेला काँग्रेसचे विधान परिषद सदस्य हरिभाऊ राठोड यांनी मात्र फाटा दिला आहे. त्यांनी आपला नोडल जिल्हा मुंबई दाखविला. त्यांच्या शासकीय निधीचे अधिकार मुंबई शहरच्या जिल्हाधिकाऱ्यांना बहाल केले.
घर यवतमाळात आणि तिजोरीची चाबी मुंबईत सोपविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तिजोरीची चाबी घरापासून दूर ठेवण्यामागे टक्केवारीच्या गणितात अडचण येऊ नये हा तर उद्देश नाही ना असा सूरही दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. मुळात हरिभाऊ राठोड यांना विधान परिषदेवर घेण्यासाठीच काँग्रेसच्या गोटातून विरोध होता. परंतु प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुलाच्या संभाव्य लोकसभा उमेदवारीचा राजकीय स्वार्थ डोळ्यापुढे ठेऊन राठोड यांचे पुनर्वसन केले. त्यासाठी राठोड यांच्या मागे बंजारा आणि भटका विमुक्त समाज असल्याचा हवाला पक्ष श्रेष्ठींना दिला गेला. मात्र हरिभाऊंनी या समाजाला गृहित धरल्याचे लोकसभा निवडणुकीत सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या झालेल्या दारुण पराभवाने सिद्ध झाले. या पराभवाने हरिभाऊंच्या प्रचाराचा ‘स्टार’ही विझला.
काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून कोणतेही वजन नसलेल्या आणि राजकीय स्वार्थापोटी भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या हरिभाऊ राठोड यांना आमदारकी दिल्याने काँग्रेसच्या गोटात माणिकरावांप्रती प्रचंड असंतोष धुमसत आहे. त्यातच आता हरिभाऊंनी आपल्या निधीचे अधिकार मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने हा असंतोष आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)