यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांच्या घरावर रुग्णवाहिका धडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:42 IST2019-02-07T14:37:28+5:302019-02-07T14:42:32+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी महाविद्यालयातील सर्व रुग्णवाहिका घेऊन चालक पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्तचौक स्थित निवासस्थानावर धडकले. यावेळी शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

यवतमाळमध्ये पालकमंत्र्यांच्या घरावर रुग्णवाहिका धडकल्या
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या आवारातून रुग्णवाहिकांना बाहेर काढण्याचा निर्णय पालकमंत्री मदन येरावार यांच्या आदेशावरून भाजपा आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्त्वातील अभ्यागत मंडळाने नुकताच घेतला होता. या निर्णयाच्या निषेधार्थ गुरुवारी महाविद्यालयातील सर्व रुग्णवाहिका घेऊन चालक पालकमंत्री मदन येरावार यांच्या दत्तचौक स्थित निवासस्थानावर धडकले. यावेळी शहराचे हृदयस्थळ असलेल्या दत्त चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर आम्हाला काढण्याऐवजी तेथे पर्यायी रुग्णवाहिका मोठ्या संख्येने उपलब्ध करून द्याव्या, अशी मागणी या रुग्णवाहिकांच्या आंदोलकांनी केली आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशावरून बाहेर काढले जात असल्याने जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर रुग्णवाहिकांसह धडक दिल्याचेही आंदोलकांनी स्पष्ट केले. अभ्यागत मंडळाचे सदस्य तथा यवतमाळ नगरपरिषदेचे बांधकाम सभापती प्रा. प्रवीण प्रजापती यांनी या रुग्णवाहिका रुग्णांना लुटत असल्याचा आरोप मंडळाच्या बैठकीत केला होता. नागपुरातील एक डॉक्टर या रुग्णवाहिका चालकांना मॅनेज करतो, म्हणून या रुग्णवाहिका रुग्णांना त्याच डॉक्टरच्या दवाखान्यात भरती करतात, असा आरोप प्रजापती यांनी केला होता. त्यावरूनच या रुग्णवाहिका महाविद्यालयाच्या बाहेर काढण्याचा निर्णय अभ्यागत मंडळाने घेतला होता. गुरुवारी पालकमंत्र्यांच्या घरावर अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.