पालकांसोबत विद्यार्थीही ऊस तोडणीच्या कामावर
By Admin | Updated: November 16, 2016 00:34 IST2016-11-16T00:34:28+5:302016-11-16T00:34:28+5:30
परिसरातील गाव- तांड्यातील शेकडो मजूर ऊस तोडणीच्या कामासाठी रवाना झाले असून आपल्या सोबत शाळकरी मुलेही

पालकांसोबत विद्यार्थीही ऊस तोडणीच्या कामावर
शाळा पडल्या ओस : पुसद तालुक्यातील गाव-तांड्यातून चालले शेकडो ऊस तोडणी मजूर
पुसद : परिसरातील गाव- तांड्यातील शेकडो मजूर ऊस तोडणीच्या कामासाठी रवाना झाले असून आपल्या सोबत शाळकरी मुलेही नेल्याने अनेक शाळा ओस पडल्या आहे. आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी या चिमुकल्यांनी लेखणी सोडून आता हातात कोयता घेतला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे भविष्य अंध:कारमय झाले आहे.
पुसद तालुक्यातील तांडे-वाड्या, छोट्या मोठ्या गावातील मजूर मोठ्या प्रमाणात ऊस तोडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात स्थलांतरित होत आहे. मजुरांच्या या स्थलांतरणामुळे गावेच्या गावे ओस पडू लागली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम ग्रामीण भागातील शाळांवर झाला आहे. शाळा विद्यार्थ्यांनाविना ओस पडू लागल्या आहे. पुसद तालुक्यातील १८७ गावांमध्ये २२३ शाळा आहेत. या तालुक्यात तांड्यांची संख्या सर्वाधिक आहे. बंजारा व आदिवासी समाज कामाच्या शोधात महानगराकडे वळत आहे. यंदा तर दुष्काळी परिस्थितीने अनेक लहान शेतकरीही ऊस तोडणीच्या कामावर गेले आहे. घरापासून लांब राहताना गावात मुलाबाळांचे आबाळ होऊ नये म्हणून या मुलांनाही सोबत नेले आहे. पहिली ते सातवीपर्यंत शिकणारे अनेक विद्यार्थी आपल्या आई-वडिलांसोबत पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी गेले आहे. काही पालकांनी आपल्या मुलांना गावात ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांंना सांभाळणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही मंडळीही मुलाबाळांसह रवाना झाली आहे.
पुसद तालुक्यातील मजूर परळी, बीड, अंबेजोगाई, परभणी, लातूर, नांदेड, औरंगाबाद, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा या भागात गेले आहे. त्यांच्यासोबत त्यांची मुलेही आहे. त्यामुळे माळपठारातील शाळांमध्ये पटसंख्या एकदम रोडावली आहे. दुसरीकडे शेकडो मुले हातात लेखणी ऐवजी कोयता घेऊन आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावत आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य मुलांचा शोध घेत आहे. तर दुसरीकडे शेकडो कामागारांची मुले शाळाबाह्य ठरत आहे. स्थलांतरीत मजुरांची नोंद कुठेही होत नसल्याने माहिती मिळणे कठीण जाते. (तालुका प्रतिनिधी)