आत्महत्यांबाबत युती सरकार उदासीन
By Admin | Updated: December 25, 2014 23:38 IST2014-12-25T23:38:20+5:302014-12-25T23:38:20+5:30
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

आत्महत्यांबाबत युती सरकार उदासीन
यवतमाळ : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकार दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांबाबत उदासीन असल्याची टीका विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
विखे पाटील देवदर्शनासाठी माहूरला गेले होते. तेथून परतल्यानंतर शासकीय विश्रामभवनावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात गारपीट झाली, मराठवाड्यातील पीक परिस्थिती समाधानकारक नाही, विदर्भातील शेती व पिके मातीमोल झाले आहे. असे असताना शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्रात भाजपाचे सरकार असूनही भरीव मदत दिली नाही. त्यामुळे आता शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता आहे. शासनाची ही उदासीनता जनतेच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना भरीव मदतीकरिता बाध्य करण्यासाठी काँग्रेसला रस्त्यावर उतरावे लागणार असल्याचे ते म्हणाले.
विधीमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाचे बुधवारी सूप वाजले. त्यावरही विखे पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, युती सरकारने घाईने अधिवेशन संपविले. एक महिना अधिवेशन चालविण्याची आमची इच्छा होती. मात्र सरकारने अल्पावधीत ते गुंडाळले. यावरून सामान्यांच्या प्रश्नावर युती सरकार गंभीर नसल्याचे दिसून येते. सरकारच्या या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या वाढू शकतात, असा आरोपही विखे पाटील यांनी केला.
तत्पूर्वी त्यांनी येथे काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार वामनराव कासावार, विजयाताई धोटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)