पंचरंगी लढतीने लागणार सर्वांचा कस
By Admin | Updated: October 4, 2014 23:34 IST2014-10-04T23:34:50+5:302014-10-04T23:34:50+5:30
वणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या

पंचरंगी लढतीने लागणार सर्वांचा कस
विनोद ताजने - वणी
वणी विधानसभेची १५ आॅक्टोबरला होणारी निवडणूक पंचरंगी लढतीने चर्चेची ठरली आहे़ पाचही उमेदवारांच्या विजयाच्या आशा बळावल्या आहे़ पाचही उमेदवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांच्या विजयाचे गणित मतदारांपुढे मांडत आहे़ निवडणूक जाणकार मात्र अजूनही निवडणुकीचे ‘एक्झीक्ट पोल’ काढण्यास असमर्थ ठरले आहे़ वणी विधानसभेसाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा व मनसे या पक्षांच्या पाच उमेदवारांमध्येच खरी लढत आहे़
वणी विधानसभेमध्ये एकास एक लढतीत काँग्रेसविरोधी उमेदवारालाच नेहमी फायदा झाला व तिरंगी लढतीत नेहमी काँग्रेसलाच फायदा झाला़ हा मतदार संघ कुणबीबहुल असला तरी या समाजाने अजून तरी समाजाच्या उमेदवारासाठी एकसंघता दाखविल्याचे कोणत्याच सर्वात्रिक निवडणुकीत दिसले नाही़ आता मतदार व कार्यकर्ते चर्चा करताना या निवडणुकीची तुलना यापूर्वीच्या २००४, २००९ च्या विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल व नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूक निकालाशी लावून तर्कवितर्क काढले जात आहे़
वणी विधानसभा मतदार संघात २ लाख ५७ हलार ३४६ मतदार आहेत़ त्यापैकी किमान ६५ ते ७० टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. म्हणजेच जवळपास १ लाख ७७ हजार मतदान होण्याची शक्यता आहे. त्यात पाच उमेदवारांव्यतिरिक्त उर्वरित आठ उमेदवार १५ हजार मतांचे वाटेकरी आहेत़ उर्वरित १ लाख ६२ हजार मतांमध्ये पाच जणांची विभागणी कशी होते, यावर विजयाचे गणित अवलंबून आहे़ सन २००४ च्या निवडणुकीत एकास एक लढत झाल्याने काँग्रेस विरोधी मतदार एकवटले होते़ त्यामुळे नांदेकरांनी कासावारांना तब्बल १४ हजार मतांनी मागे टाकले होते़ सन २००९ च्या निवडणुकीत लढत चौरंगी झाली़ त्यावेळी मनसेचे राजू उंबरकर यांनी पहिल्यांदाच निवडणुकीत उडी घेऊन विरोधी मतांमध्ये वाटेकरी बनून ११ हजार मते आपल्याकडे खेचली़ देरकर यांनीही ४१ हजार मते घेतली होती. त्यामुळे नांदेकरांना ४५ हजारांवर आणण्यात या दोन उमेदवारांनी महत्वाची भूमिका बजावली होती. परिणामी कासावार हे ५५ हजार ६६६ मते घेऊन विजयी झाले होते. त्यावेळी देरकर रिंगणात नसते, तर कासावारांचा पराभव निश्चित होता़
आता नुकतीच एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक झाली़ या निवडणुकीत काँग्रेस विरोधी लाट होती़ तरीही काँग्रसचे संजय देवतळे यांनी वणी विधानसभा मतदार संघातून ३८ हजार २०७ मते घेतली़ याचा अर्थ वणी विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाची एवढी मते पक्की आहे, असा निष्कर्ष काढला जात आहे. आपचे उमेदवार चटप यांना २८ हजार मते मिळाली़ त्यावेळी देरकर चटप यांचेसोबत होते़ म्हणजेच देरकरांचीही तेवढी मते पक्की मानली जात आहे. त्यावेळी हंसराज अहीर यांना वणी विधानसभेत विक्रमी ९२ हजार मते मिळाली होती़ आता यापैकी किती मते भाजपाचे उमेदवार संजीवरेड्डी आपल्या झोळीत ओढू शकतात, त्यावर नांदेकरांचे भवितव्य अवलंबून आहे.
अहीर यांच्या ९२ हजार मतांपैकी ५० हजार मते ज्यांच्या झोळीत पडतील, त्या उमेदवाराचे भवितव्य उज्वल समजले जात आहे. मात्र ९२ हजार मतांची विभागणी समसमान नांदेकर, बोदकुरवार यांच्यामध्ये झाल्यास दोघांचेही देऊळ पाण्यात आले़ त्यातच या चारही उमेदवारांसमोर उंबरकरांनीही कडवे आव्हान उभे केले आहे़
नुकत्याच झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेमुळे त्यांच्या मतांमध्ये मागील वेळेपेक्षा भरीव वाढ होण्याची शक्यता आहे़ त्यामुळे यावेळी २००४, २००९ व लोकसभा निवडणुकीवरून अंदाज काढल्यास ते निरर्थक ठरण्याची शक्यता आहे. या मतदार संघाची वास्तव स्थिती मशीनची दारे उघडल्यानंतरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे़