राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुजोरीपुढे सर्वच हतबल
By Admin | Updated: July 15, 2016 02:34 IST2016-07-15T02:34:50+5:302016-07-15T02:34:50+5:30
राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांच्या मुजोरीपुढे सर्वच हतबल
पीककर्ज वाटप : शेतकरी मिशन देणार दिल्लीत धडक
यवतमाळ : राष्ट्रीयकृत बँकांच्या पीककर्ज वाटपातील मुजोरीपुढे सरकार, प्रशासनाने हात टेकले आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनने बँकांच्या या भूमिकेबाबत पुढील आठवड्यात थेट दिल्लीत धडक देण्याची तयारी चालविली आहे.
जिल्हा प्रशासनाने सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँकांना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले होते. सहकारी बँकांनी हे उद्दिष्ट जवळपास गाठले असले तरी राष्ट्रीयकृत बँका अद्याप अर्ध्यावरही पोहोचलेल्या नाही. या बँकांचे कर्ज वाटप अवघे ४० टक्क्यांवर आहे. त्यातही सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वात मागे असल्याचे सांगितले जाते. एसबीआयला ४७० कोटींच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. परंतु या बँकेने केवळ १७० कोटी रुपयांचे वाटप केले. खरीप हंगामाची पेरणी आटोपली असताना ही बँक उर्वरित २०० कोटींचे कर्ज केव्हा वितरीत करणार, असा सवाल आहे. युनियन बँकेबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या तक्रारी आहे. या बँकेत शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप आहे. पीककर्ज वाटपासाठी ३१ मे ही अंतिम तारीख होती. त्यानंतर ३१ जून व आता ३१ जुलै उजाडतेय, तरीही बँका पेरणीसाठी पैसे देत नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून प्रत्येकवेळी रिझर्व्ह बँकेची नियमावली पुढे केली जात आहे. एक कोटींच्या शेताचा मालक असलेल्या शेतकऱ्याला एक लाखाचे कर्ज देण्यासाठी ऐवढे हेलपाटे का, असा सवाल विचारला जात आहे. पीककर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बँकांच्या कठोर व मुजोर धोरणापुढे मंत्री, आमदार, प्रशासन असे सर्वच घटक हतबल झाले आहे. खास शेतकऱ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीही बँकांच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रीयकृत बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढावे, नव्या शेतकऱ्यांना कर्ज देता यावे, यासाठी आपण प्रयत्नरत असल्याचे तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. राष्ट्रीयकृत बँका कर्ज देण्याऐवजी शेतकऱ्यांवर हात उगारत आहेत. बँकांमुळेच शेतकरी आत्महत्या वाढत असल्याचे तिवारी म्हणाले. ३१ मे ही कर्ज वाटपाची शेवटची तारीख असताना या तारखेपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांनी पीककर्जाचे वाटपच सुरू केले नव्हते, अशी माहितीही तिवारी यांनी दिली. (जिल्हा प्रतिनिधी)