करवाढीविरोधात सर्व नगरसेवकांची एकजूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:06 IST2019-02-10T00:05:09+5:302019-02-10T00:06:07+5:30
हद्दवाढीने तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांवर चुकीच्या प्रक्रियेने मालमत्ता कर आकारणी करण्यात आली. याविरोधात यवतमाळ नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आहेत.

करवाढीविरोधात सर्व नगरसेवकांची एकजूट
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हद्दवाढीने तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या भागातील नागरिकांवर चुकीच्या प्रक्रियेने मालमत्ता कर आकारणी करण्यात आली. याविरोधात यवतमाळ नगरपालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र आले आहेत. त्यांनी विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्याची मागणी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
उमरसरा, वडगाव, पिंपळगाव, वाघापूर, लोहारा, भोसा, मोहा या ग्रामपंचायती तीन वर्षांपूर्वी नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. या भागासाठी नगरपरिषदेने वाढीव मालमत्ता कराची आकारणी केली. सदर प्रकरण जिल्हाधिकाºयांकडे कलम ३०८ अंतर्गत न्यायासाठी प्रलंबित आहे. या अपिल प्रकरणात कुठलीही बाधा न येता सदर भागातील मालमत्ता कर आकारणी वसुली मोहिमेला गती मिळावी यासाठी विशेष सभा घ्यावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवाय सभेच्यादृष्टीने विषय पत्रिकेवर कुठले विषय घेतले जावे, हेही सूचविण्यात आले आहे.
हद्दवाढ आणि मूळ हद्दीतील नागरिकांवर मालमत्ता कर आकारणीसाठी लावलेला दंड आणि इतर आकारणी शुल्क रकमेत सूट मिळावी, शासनाच्या विविध योजनांतर्गत मिळणारे अनुदान, निधी, मालमत्ता कर, बाजार कर आणि इतर प्राप्त उत्पन्न तसेच पालिकेच्या विविध कामासाठी होणाºया खर्चाचा तपशील प्रत्येक महिन्याच्या सर्वसाधारण सभेत लेखी स्वरूपात सादर व्हावा, पालिकेच्या प्रत्येक विभागातील कार्यसूची कर्मचाºयांच्या नावासह दर्शनी भागावर लावली जावी, वाहनतळावर येणाºया नागरिकांना आणि नगरसेवकांच्या कामाबाबत माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष आदी बाबींवर या सभेमध्ये विचारविनिमय व्हावा, असे यात नमूद करण्यात आले आहे. माजी आरोग्य सभापती दिनेश चिंडाले यांनी ही माहिती कळविली आहे.
सैनिकांना करातून सूट द्यावी
नगरपरिषदेच्या मालमत्ता करातून सूट देऊन सैनिकांच्या देशसेवेचा गौरव व्हावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सैनिक, माजी सैनिक, सैनिक विधवा, स्वातंत्र्य सैनिकांना मालमत्ता करातून सूट मिळावी यासाठी बैठकीत विचारविनिमय व्हावा, असे म्हटले आहे.
ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ
हद्दवाढ क्षेत्रातील मनरेगा योजनेंतर्गत नोंदणीकृत झालेल्या जॉबकार्डधारकांची संख्या १२ हजार ५५९ एवढी आहे. या मजुरांवर आणि ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना ‘क’ वर्ग नगरपरिषदेप्रमाणे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकाºयांमार्फत नागपूर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला जावा, असे सूचविण्यात आले आहे.