आस दर्शनाची
By Admin | Updated: October 21, 2015 02:40 IST2015-10-21T02:40:03+5:302015-10-21T02:40:03+5:30
नवरात्रातील नऊ दिवस भक्तांसाठी पावन असतात. या दिवसात देवीचे भक्त मातेची मनोभावे पूजाअर्चा करतात.

आस दर्शनाची
लोकमत विशेष
रुपेश उत्तरवार यवतमाळ
नवरात्रातील नऊ दिवस भक्तांसाठी पावन असतात. या दिवसात देवीचे भक्त मातेची मनोभावे पूजाअर्चा करतात. यासोबत नऊ दिवस उपवास केला जातो. काही भक्त नऊ दिवस निरंकाळ उपवास करतात. तर काही जण दिवसातून एकदा भोजन करतात. अनेक भक्तगण नवरात्रीच्या काळात पायात चप्पल घालणे वर्ज्य करतात. देवीचे दर्शन घेता यावे म्हणून सामूहिक उत्सव साजरा केला जातो. हा उत्सव गावागावात साजरा होत असतो. असे असले तरी यवतमाळ शहरातील विलोभनीय देखावे जिल्हावासीयांनाच नव्हे तर परजिल्ह्यातील नागरिकांनाही खुणावत आहेत. मातेच्या दर्शनाची आस घेऊन रांगेत तासन्तास उभे राहणारे भक्त पाहायला मिळतात. यातून शहरात भक्तांचा अखंड महापूर वाहताना पाहत आहे.
यवतमाळ शहराला शतकाचा इतिहास लाभला आहे. १०० वर्षांपूर्वी यवतमाळला यवत नावाने ओळखले जात होते. त्याकाळी गावाच्या बाहेर शितलामातेचे मंदिर होते. काजण्याची साथ पसरताच भक्तगण शितलामातेला दहीभाताचे बोणे आणि जल चढवित होते. लिंबाचा डहळ्या आणि पाणी बाळाच्या अंगाला लावले जात होते. यामुळे काजण्यांचा आजार बरा होत होता. त्याकाळी शितलामाता ग्रामदैवत म्हणून मानले जात होते.
प्लेगची साथ आली त्यावेळी संपूर्ण वसाहत मातेला शरण आली. देवीची आराधना केली. ७७ वर्षांपूर्वी नवरात्र उत्सवाला याच ठिकाणावरून प्रारंभ झाला. त्यावेळी या मंडळाला हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळ म्हणून ओळखले जात होते. या ठिकाणी शितलामातेचे प्राचीन मंदिर आहे. भक्तगण देवीची मनोभावे पूजा करतात. जल अर्पण करतात. भक्तांची मनोकामना या ठिकाणी पूर्ण होते. यामुळे चांदीचा पाळणा, छत आणि ओटी भरण्याची परंपरा या ठिकाणी आहे. ही परंपरा आजही जपली जाते.
नवरात्री उत्सवात मध्यरात्रीपासून शितलामातेला जल अर्पण करण्यासाठी महिलांची प्रचंड गर्दी होते. मध्यरात्रीही मातेच्या दर्शनासाठी लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळते. विशेष म्हणजे, महिला अनवाणी पायांनी जल अर्पण करण्यासाठी येतात. ज्यांची इच्छा पूर्ण झाली, त्या महिला मनोकामना झुला मातेला अर्पण करतात. अनेक भक्त ही अखंड परंपरा कायम ठेवत आहेत.
यवतमाळ शहरासह लगतच्या गावामधून भक्तगण मोठ्या संख्येने दाखल होतात. यामध्ये वाघापूर, पिंपळगाव, लोहारा, भोसा, वडगाव, मोहा, डोर्ली, किन्ही या गावातील महिलाही शितलामातेला जल अर्पण करण्यासाठी येतात. यामुळे आठवडी बाजारात असलेल्या शितलामातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांची प्रंचड गर्दी पाहायला मिळते. यातून अहोरात्र गर्दीचा महापूरा शहरातून वाहताना दिसतो. तर दुसरीकडे शहरातील मंडळांनी साकारलेले सुरेख देखावे पाहण्यासाठी जिल्ह्यातील वाड्या, वस्त्या, पोड आणि गावखेड्यातून भक्त मंडळी दर्शनासाठी येत आहे. शहरातील आझाद मैदान, आर्णी मार्ग, मुख्य बाजारपेठ, पोस्टल मैदानावर
वाहनांची पार्किंगसाठी मोठी गर्दी होते. मिनीडोअर, आॅटो, मालवाहू गाड्या, चारचाकी वाहन, खासगी ट्रॅव्हल्स, एसटी बस, खासगी वाहनांनी दररोज शेकडो भक्त दर्शनाकरिता यवतमाळात येत आहेत.
प्रचंड आर्थिक उलाढाल
दुर्गोत्सवाच्या अनुषंगाने भक्तांचे लोंढे शहराकडे वाहत आहेत. या भक्तांनी मातेच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे. यामुळे खासगी वाहनांना मोठ्या प्रमाणात प्रवासभाडे मिळाले आहे. तर शहरातील आर्थिक उलाढालही प्रचंड वाढली आहे. दर्शनासाठी येणारे भक्त आठवण म्हणून विविध वस्तूंची खरेदी करतात. यासोबतच उपवासाचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. यातून शहरातील आर्थिक उलाढालीत मोठी भर पडत आहे. अनेकांना उत्सवातून नवा रोजगार मिळाला आहे.
अहोरात्र ओसंडून वाहतोय भक्तीचा महापूर
अनवानी पायाने चालतात भक्तगण
शितलामातेच्या जलाभिषेकासाठी मध्यरात्रीपासून रांगा
जिल्हाच नव्हे तर परजिल्ह्यातूनही आले मातेचे भक्त प्रबोधनपर फलकाने वेधले लक्ष