खाणीतील ब्लास्टिंगमुळे शेती संकटात
By Admin | Updated: December 29, 2014 02:13 IST2014-12-29T02:13:45+5:302014-12-29T02:13:45+5:30
येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अडेगाव शिवारात डोलोमाईट कंपन्याचे बस्तान असून कंपन्याच्या निघणाऱ्या धुरामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ ...

खाणीतील ब्लास्टिंगमुळे शेती संकटात
मुकुटबन : येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अडेगाव शिवारात डोलोमाईट कंपन्याचे बस्तान असून कंपन्याच्या निघणाऱ्या धुरामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे़ त्यामुळे पिकावर परिणाम होत आहे़ त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी परिसरातील असलेल्या डोलोमाईटच्या कंपन्या बंद करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यासह आमदारांना निवेदनाद्वारे कळविले आहे़ न्याय न मिळाल्यास उपोषणास बसण्याचा इशारासुध्दा दिला आहे़
सध्या अडेगाव शिवारात आयुषी मिनरल्स, ईशान गोल्ड, गुंडावार माईन्स अशा नावाच्या तीन डोलोमाईटच्या कंपन्या कार्यरत आहे़ कंपन्याच्या सभोवताल शेतकऱ्यांच्या शेती आहे़ सदरच्या कंपन्यामधून निघत असलेल्या धुरामुळे शेतातील पिकावर धूर व कण साचून पिकांचे फार मोठे नुकसान होत आहे़ त्याचप्रमाणे या धुराच्या कणांमुळे आजुबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांना प्रदूषणामुळे त्वचारोग, दमासारखे आजारही होत आहे़ या तिनही कंपनीत जमिनीतील खनिज काढण्यासाठी ब्लास्टिंग करण्यात येते़ ही ब्लास्टिंग ठरवलेल्या वेळात होत नसून वेळीअवेळी होणाऱ्या ब्लास्टींगमुळे दगडाचे लहान-मोठे तुकडे उंचावरून कंपन्या लगत असलेल्या शेतातील शेतकरी मजुरदार व पिकांवर पडतात़ त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांच्या जीवास धोका होत आहे़ विशेष म्हणजे ब्लास्टिंगच्या वेळी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या शेतकऱ्यांना ब्लास्टिंग होतपर्यंत वाट पाहावी लागतात़ याबाबत शेतकरी मुरलीधर बेलेकर यांनी २२ नोव्हेंबर २०१४ ला दुपारी ४़३० वाजताच्या दरम्यान ब्लास्टिंग थांबविले.
त्यावरून कंपनीने या शेतकऱ्याविरूद्ध मुकुटबन पोलीस ठाण्यात तक्रार केली़ तक्रारीवरून शेतकरी मुरलीधर बेलेकर यांच्यावर कामात अडथळा केल्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला़ सध्या तरी मुकुटबन व अडेगाव शिवारात असलेल्या विविध कंपन्यांनी दादागिरी सुरू केली असून वेळीच यांना आळा न घातल्यास भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामास शेतकऱ्यांना बळी पडावे लागणार आहे़ याबाबत अडेगाव येथील शेतकऱ्यांनी कंपनीला वेळोवेळी निवेदनाद्वारे कळविले आहे़ कंपनीने शेतकऱ्यांच्या मागण्याला केराची टोपली दाखविली आहे़ झालेल्या नुकसानीची मागणी केली असून त्याचबरोबर ब्लास्टिंग बंद करून कंपन्या बंद करण्याबाबतचे निवेदन आमदार बोदकुरवार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी केळापूर, पोलीस स्टेशन मुकुटबन, तलाठी अडेगाव, आयुष मिनरल, ग्रामपंचायत अडेगाव, इशान गोल्ड, गुंडावार माईन्स यांना दिले आहे़
न्याय न मिळाल्यास तहसील कार्यालय झरीसमोर न्याय मिळेपर्यंत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे़ यामध्ये शेतकरी शंकर क्षीरसागर, मुर्लीधर क्षीरसागर, देवराव क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, रामचंद्र दुरडकर, शिवशंकर दुरडकर, शामराव दुरडकर, पुंडलीक बेलेकर, किसन बेलेकर, मंगल बेलेकर, जितेंद्र बेलेकर यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत़ (शहर प्रतिनिधी)