पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीचा खटाटोप
By Admin | Updated: October 26, 2014 22:47 IST2014-10-26T22:47:04+5:302014-10-26T22:47:04+5:30
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या एकाही दिग्गजाला गड राखता आला नाही. या पराभवाला अनेक कारणे

पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीचा खटाटोप
यवतमाळ : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारून पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या एकाही दिग्गजाला गड राखता आला नाही. या पराभवाला अनेक कारणे असले तरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत सुंदोपसुंदी त्यातील महत्वाचे कारण होय. आता पराभवाचे चिंतन करण्याऐवजी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी निवडण्याचा खटाटोप सुरू झाला आहे. यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात काही ठराविक नेत्यांची शनिवारी दुपारी बैठक झाली.
राजकारणात दिग्गज असलेल्यांना त्यांच्या परंपरागत विरोधकांकडूनच मात मिळाली. यामुळे कुठलेही स्पष्टीकरण देण्याची सोय त्यांच्याजवळ नाही. प्रदीर्घ काळ सत्ता असूनही इतका दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांना कार्यकारिणी निवडण्याची आठवण झाली आहे. येथील नेते बरेचदा संघटनेच्या पुढे जाऊनही आपण आहोत, अशा तोऱ्यात वावरताना दिसले. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बैठकांमध्ये नेत्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्याच कार्यकर्त्यांची कशी मुसकटदाबी करता येईल याची व्युहरचना आखण्यातच नेते मंडळींचा वेळ खर्ची पडला. अशातच विधानसभा निवडणुका लागल्या आणि विरोधात असलेले परंपरागत स्पर्धक या काँग्रेस नेत्यांच्या पुढे निघून गेले. आज चारीमुंड्या चित झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांना कार्यकारिणीची आठवण झाली आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात दोन माजी मंत्री आणि दोन माजी आमदारांची बैठक झाली. कुणालाही याबाबत सूचना न देताच जिल्हा कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मर्जीतील ठराविक कार्यकर्त्यांकडून प्रस्तावही मागविण्यात येत आहे. दोन दिवसात काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या इतिहासात प्रथमच कार्यकारिणी नसताना निवडणूक झाल्याचे ज्येष्ठांकडून सांगण्यात येत आहे. निवडणूक काळात जिल्ह्याचे प्रभारी म्हणून डॉ.वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केली होती. मात्र निवडणूक संपताच जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार सक्रिय झाले आहेत. त्यांच्या समवेत माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संजय देशमुख यांनी काही निवडक सदस्यांची बैठक घेऊन हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आता कार्यकारिणी निवडतानाही या नेत्यांकडून गटबाजी व वशिलेबाजीला प्राधान्य दिले जात काय याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)