कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी परतफेड थांबविली
By Admin | Updated: June 15, 2017 00:58 IST2017-06-15T00:58:09+5:302017-06-15T00:58:09+5:30
कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे.

कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी परतफेड थांबविली
नवीन कर्जासाठी गर्दी : ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी फेडले
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कर्जमाफीच्या घोषणेनंतर बँकांमधील कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या थांबली आहे. नवीन कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे एकच गर्दी केली आहे. मात्र आदेशच नसल्याने या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे आत्तापर्यंत ३५ हजार शेतकऱ्यांनी २६० कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड केली आहे. पेरणीपूर्वी काही प्रमाणात शेतकरी कर्जाच्या परतफेडीसाठी बँकांकडे जात होते. मध्यंतरी कर्जमाफीची घोषणा झाली. यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची प्रक्रिया थांबविली आहे.
नव्याने कर्ज मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकाकडे धाव घेतली आहे. शासनाच्या आदेशानुसार पुढील कारवाई होणार असल्याचे बँकांनी स्पष्ट केले आहे. दररोज शेकडो शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ बँक कर्मचाऱ्यांवर ओढविली आहे.
नवीन कर्जाचा तिढा
शासनाने अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना तातडीने नवीन कर्ज देण्याचीही घोषणा केली आहे. मात्र या संदर्भात अद्यापही बँकांना अधिकृत आदेश पोहोचले नाही. तसेच तातडीने दहा हजार रुपये कर्ज देण्यासंदर्भातही कोणतेही आदेश नाही. त्यामुळे नवीन कर्जाचा तिढा निर्माण झाल्याने पेरणीचे संकट ओढवले आहे.