अखेर प्रसाधनगृहाचा प्रश्न मार्गी लागणार
By Admin | Updated: December 23, 2014 23:12 IST2014-12-23T23:12:56+5:302014-12-23T23:12:56+5:30
शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रसाधनगृहाअभावी महिलांची होणारी कुचंबना ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रसाधनगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सर्वसाधारण सभेत जागा उपलब्धतेबाबत ठराव घेण्यात आला

अखेर प्रसाधनगृहाचा प्रश्न मार्गी लागणार
पुसद : शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रसाधनगृहाअभावी महिलांची होणारी कुचंबना ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर प्रसाधनगृहाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. सर्वसाधारण सभेत जागा उपलब्धतेबाबत ठराव घेण्यात आला असून प्रसाधनगृह उभारण्यासाठी पुसद अर्बन बँक पुढाकार घेणार आहे. येत्या आठ दिवसात चार ठिकाणी प्रसाधनगृह बांधण्याची ग्वाही आरोग्य सभापती अॅड. भारत जाधव यांनी दिली.
पुसद ही जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. या ठिकाणी बाहेरगावहून येणाऱ्यांची मोठी गर्दी असते. त्यात महिलांची संख्याही अधिक असते. परंतु पुसद बाजारपेठेत महिलांसाठी एकही स्वतंत्र प्रसाधन व स्वच्छतागृह नाही. त्यामुळे महिलांची मोठी कुचंबना होत असते. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी नगरपरिषदेला पत्र लिहून पालिकेने जागा उपलब्ध करुन दिल्यास बँकेमार्फत शौचालय व प्रसाधनगृह उभारुन देण्याचे त्यांनी कळविले. त्यावर पुसद नगरपरिषदेने सकारात्मक विचार करून सर्वसाधारण सभेत प्रसाधनगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव केला. त्यानुसार येथील सार्वजनिक वाचनालय परिसर, सुभाष चौक, शिवाजी चौक, गांधी चौक या चार ठिकाणी प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी २४ तास पाणी, वीज जोडणी नगरपरिषदेने उपलब्ध करून द्यावी, त्याची देखभाल पुसद अर्बन बँक करणार आहे. त्याच प्रमाणे बीओटी तत्वावर शहरात दोन ठिकाणी सुलभ शौचालय उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात आरोग्य सभापती अॅड. भारत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुख्य बाजारपेठेतील महिलांच्या प्रसाधनगृहाबाबत नगरपरिषदेने ठराव केल्याचे सांगितले. येत्या आठ दिवसात बांधकाम सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मैंद म्हणाले, शहरात चार ते पाच ठिकाणी प्रसाधनगृह उभारण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे.