अन् ३९ वर्षांनंतर पुसदमध्ये भरला वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 06:00 IST2019-08-31T06:00:00+5:302019-08-31T06:00:11+5:30
शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात १९८० साली दहावीचे पेपर संपले आणि सर्व जण महाविद्यालयाकडे आपले भविष्य घडविण्यासाठी निघाले. ३९ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिनी सर्व वर्ग मित्रांनी सकाळी ७.३० वाजता को.दौ. शाळेत झेंडा वंदनाला उपस्थिती दर्शविली.

अन् ३९ वर्षांनंतर पुसदमध्ये भरला वर्ग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शाळा सोडून तब्बल ३९ वर्षे झाली. कामानिमित्त कोण कुठे असेल, याची कुणालाही कल्पना नाही. मात्र म्हणतात ना रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते महत्वाचे असते. या मित्रत्वाचे नाते जोपासणारे शाळेतील काही मित्र-मैत्रिणी १९८० ला शाळा सोडल्याननतर तब्बल ३९ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. अन् तब्बल ३९ वर्षांनंतर त्यांचा पुन्हा वर्ग भरला.
शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित येथील कोषटवार दौलतखान विद्यालयात १९८० साली दहावीचे पेपर संपले आणि सर्व जण महाविद्यालयाकडे आपले भविष्य घडविण्यासाठी निघाले. ३९ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिनी सर्व वर्ग मित्रांनी सकाळी ७.३० वाजता को.दौ. शाळेत झेंडा वंदनाला उपस्थिती दर्शविली.
त्यानंतर विद्यालयाला कायमस्वरुपी २५ हजार रुपयांची मुदती ठेव बहाल केली. त्यातून मिळणाऱ्या व्याजातून दहावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्याचे जाहीर केले. यानंतर सर्व मित्रांनी स्वत:चा परिचय दिला. सायंकाळी सेवानिवृत्त शिक्षक अनंत उपाध्ये, नारायण क्षीरसागर, वसंत ताजनेकर, निलीमा लांबे, रामचंद्र रेवणवार, राजेंद्र आमले या गुरुजनांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार केला. रात्री काही उत्साही वर्गमित्र-मैत्रिणींनी गायन, नृत्य व मिमिक्री सादर केली.
या स्नेहमिलन सोहळ्यात डॉ.उमेश रेवणवार, किशोर जाजू, डॉ.विजय जाजू, अॅड.उमाकांत पापीनवार, प्रमोद रायपूरकर, अॅड.सुनील बिडवई, डॉ.सुहास पळसकर, गिरीश देशमुख, संजय एडतकर, अतुल जकाते, डॉ.संजय जोशी, समीर भास्करवार, संतोष देशमुख, धनंजय गायकवाड, शशिकांत जहागिरदार, शैलेश नाईक, संजय बयास, मंजुषा राठोड, मंजुषा देशमुख, संजय तांबेकर, अशरफ अमदनी, उज्वला वाघमारे, विनायक सेवकर, रवी देशपांडे, डॉ.सुप्रिया चिद्दरवार, संजय भंडारी, विलास वायकोस, धनंजय पांडे आदी सहभागी झाले होते.