‘आधार लिंक’विना अडली शिष्यवृत्ती
By Admin | Updated: February 18, 2017 00:33 IST2017-02-18T00:33:52+5:302017-02-18T00:33:52+5:30
शिष्यवृत्तीत परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्यात मुख्याध्यापकांनी हयगय केली.

‘आधार लिंक’विना अडली शिष्यवृत्ती
जिल्हाधिकाऱ्यांचा दणका : शिक्षणाधिकारी कार्यालयाचे थांबविले वेतन
अविनाश साबापुरे यवतमाळ
शिष्यवृत्तीत परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या दीडशे विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्यात मुख्याध्यापकांनी हयगय केली. त्यामुळे जानेवारी महिन्याची त्यांची शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा होऊ शकली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली असून जोवर विद्यार्थ्यांचे खाते आधार लिंक होत नाही, तोवर शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दर पंधरवड्यात आढावा घेतला जात आहे. परंतु, वारंवार सूचना देऊनही अनेक मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार लिंक करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ‘एनएमएमएस’ शिष्यवृत्तीची रक्कम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दरमहिन्याला बँक खात्यात मिळत आहे. परंतु, आता विविध लाभाच्या योजनांचे पैसे खात्यात जमा करताना, त्या खात्याशी लाभार्थ्याचा आधार क्रमांक जोडणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील १५८ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्यापही त्यांच्या खात्याशी लिंक झालेले नाही. मुख्याध्यापकांनी यात हयगय केली आहे. मात्र, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय कमी पडत आहे.
याच कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जानेवारीचे वेतन थांबवून ठेवले आहे. जोपर्यंत मुख्याध्यापक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या खात्याशी लिंक झाल्याचे प्रमाणपत्र बँकेकडून मिळवत नाही, तोपर्यंत वेतन निघणार नाही. शिवाय वेळेत काम न झाल्यास फेब्रुवारीचेही वेतन थांबविण्यात येणार आहे.
राज्यात मे २००८ पासून एनएमएमएस (नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्किम) ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात आहे. ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.
वार्षिक सहा हजारांची ही शिष्यवृत्ती दरमहिन्याला ५०० रुपये याप्रमाणे वाटप केली जाते. प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर होणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचीच ‘एनएमएमएस’करिता निवड केली जाते.