आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेत माघारले

By Admin | Updated: November 29, 2014 23:27 IST2014-11-29T23:27:05+5:302014-11-29T23:27:05+5:30

शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी

Adivasi students withdrew in quality | आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेत माघारले

आदिवासी विद्यार्थी गुणवत्तेत माघारले

वास्तव उघड : ‘पीओं’ची मुक्कामी भेट
प्रदीप दुधकोहळे - शिबला (झरी)
शासकीय व खासगी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे आदिवासी विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेत माघारले आहे. गणित आणि विज्ञानात तर ते कोसोदूर आहेत. प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळांना दिलेल्या मुक्कामी भेटीत हे वास्तव उघड झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात पुसद आणि पांढरकवडा ही दोन आदिवासी विकास प्रकल्प कार्यालये आहेत. पुसद प्रकल्पांतर्गत सात शासकीय व १२ खासगी तर पांढरकवडा प्रकल्पांतर्गत २१ शासकीय व २८ खासगी आदिवासी आश्रमशाळा आहेत. या आश्रमशाळांमधील सोईसुविधा, आहार, साहित्य पुरवठा, व्यवस्था, शिक्षण, शिक्षकांची उपस्थिती याबाबत नेहमीच ओरड ऐकायला मिळते. त्या पार्श्वभूमीवर पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. प्रशांत रुमाले यांनी शुक्रवारी रात्रीच्यावेळी आश्रमशाळांना भेटी देऊन वास्तव जाणून घेण्यासाठी तेथेच मुक्कामी राहण्याचा निर्णय घेतला. झरी जामणी तालुक्यातील शिबला शासकीय आदिवासी आश्रमशाळेत त्यांचा शुक्रवारचा मुक्काम होता. त्यांनी पांढरकवड्यापासून ४० किमी अंतरावर दुर्गम भागात असलेल्या, पट्टेदार वाघाची दहशत असलेल्या व सायंकाळनंतर सहसा कुणी जाण्याची हिंमत करीत नाही, अशा माथार्जुन आश्रमशाळेलाही रात्री ११ वाजता भेट दिली. याशिवाय मार्की शाळेचीही तपासणी करण्यात आली. या भेटीमध्ये बरेच वास्तव उघड झाले.
आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणारे वर्ग १ ते १० चे विद्यार्थी गुणवत्तेत बरेच माघारल्याचे दिसून आले. विज्ञान आणि गणितासारख्या विषयात हे विद्यार्थी सर्वाधिक मागे आहेत. भाषा व अन्य विषयातही हीच स्थिती आहे. त्यासाठी विविध बाबी जबाबदार असल्याचे सांगितले जाते. विद्यार्थ्यांची गैरहजेरी हे प्रमुख कारण पुढे आले आहे. शिक्षकांची रिक्त पदे हेसुद्धा एक कारण पुढे आले आहे.
या पार्श्वभूमीवर डॉ. प्रशांत रुमाले यांनी विविध उपाययोजना जागीच सूचविल्या व त्याची अंमलबजावणीही करून घेतली. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचे वाटप करून त्यांच्यावर जबाबदारी दिली गेली. पालकांमध्ये शिक्षणाप्रती जनजागृती व्हावी म्हणून शाळास्तरावरच पालकांचे नियमित मेळावे घेण्याचे ठरले. त्यासाठी ‘स्कूल फिडींग’ ही पद्धत अवलंबिली जाणार आहे. शिक्षक व शिक्षणातील त्रुट्या दूर केल्या जातील. या माध्यमातून शिक्षकांना मुख्यालयी राहण्यास प्रवृत्त केले जाईल. आश्रमशाळांमधील सोईसुविधांवरही या मुक्कामी भेटीत भर दिला गेला. कर्मचारी मुख्यालयी राहतात की नाही याची तपासणी केली गेली. सुरक्षा कठडे, डास प्रतिबंधक जाळ्या, खिडक्यांना, दारांना कडीकोंडे, तणनाशक फवारणी, फॉगिंग, नियमित वैद्यकीय तपासणी, सक्षम महिला अधीक्षकांच्या नियुक्त्या, विजेची पुरेशी व्यवस्था यावर भर देण्यात आला. शिक्षकांच्या रिक्त पदांवर तातडीचा पर्याय म्हणून कमी विद्यार्थी संख्या असलेल्या बोथ, रोडा सारख्या शाळांचे शिक्षक विद्यार्थी गर्दी असलेल्या शाळांमध्ये वळविणे, समायोजित शाळांच्या शिक्षकांना गरजेच्या ठिकाणी सामावून घेणे, तासिका तत्वावर शिक्षक नेमणे या उपाययोजना गुणवत्तावाढीसाठी केल्या गेल्या. मात्र विज्ञान व गणित या विषयात तासिका तत्वावरील शिक्षकांची बरीच कमतरता व आवश्यकता प्रकल्प अधिकाऱ्यांना मुक्कामी भेटीत आढळून आली.

Web Title: Adivasi students withdrew in quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.