आदिवासी विद्यार्थिनींचे उपोषण
By Admin | Updated: July 29, 2016 02:20 IST2016-07-29T02:20:50+5:302016-07-29T02:20:50+5:30
शहरातील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सायंकाळपासून उपोषण सुरू केले.

आदिवासी विद्यार्थिनींचे उपोषण
विविध मागण्या : वसतिगृहासमोरच दिला ठिय्या
यवतमाळ : शहरातील शिवाजीनगर परिसरातील आदिवासी शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनींनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सायंकाळपासून उपोषण सुरू केले. वसतिगृहाच्या प्रवेशद्वारावरच या विद्यार्थिनींनी ठिय्या दिला आहे.
मुलींच्या आदिवासी शासकीय वसतिगृहातील निकृष्ट दर्जाचे जेवण आणि गृहपाल व कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणी करीत त्यांनी उपोषणाला सुरूवात केली. जेवण नेहमीच अत्यंत निकृष्ट दर्जाचे मिळत असल्याने भोजनात सुधारणा करावी, तसेच भोजन कंत्राटदार बदलविण्याची मागणी यांनी लावून धरली आहे. याशिवाय गृहपाल आणि कर्मचाऱ्यांची बदली करावी, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे, निवासी गृहपालाची नियुक्ती करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
वसतिगृहातील कर्मचारी शिवीगाळ करतात, असा त्यांचा आरोप आहे. समस्या घेऊन गृहपालांकडे गेल्यास वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्याची धमकी दिली जाते, निकृष्ट जेवणामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होतो, दहा बाय दहाच्या खोलीत १३ ते १४ मुलींना राहावे लागते, दवाखान्यात नेताना पैसे घेतले जातात, कर्मचारी सोबत येत नाही, वसतिगृह स्वच्छ राहात नाही, कर्मचारी स्वत:ची कामे मुलींना सांगतात, भत्ता व्यवस्थित दिला जात नाही, आदी आरोपही विद्यार्थिनींनी केले आहे. या उपोषणाची दखल घेत गुरूवारी पांढरकवडा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी के.बी.पंधरे आणि डी.जे.उरकुडे यवतमाळात दाखल झाले. त्यांनी विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेत तातडीने प्रकल्प अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या समस्या निर्धारित वेळेत सोडविण्याची ग्वाही दिली. मात्र विद्यार्थिनींनी मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात, असा हेका धरला. त्यामुळे वृत्तलिहिस्तोवर उपोषण सुरू होते.
दरम्यान, वसतिगृहाच्या गृहपाल सध्या प्रशिक्षणासाठी बाहेर गावी गेल्या आहेत. प्रभारी गृहपाल म्हणून टी.एम.अगलधरे काम पाहात आहे. त्यांनी उपोषणकर्त्या विद्यार्थिनींना जेवण करून घेण्याची विनंती केली. तसेच प्रवेशव्दारासमोर उपोषण न करता वसतिगृहाच्या प्रांगणात बसण्याचीही विनंती केली. मात्र उपोषणकर्त्या विद्याीर्थिनींनी त्यांची विनंती फेटाळून लावत प्रवेशव्दारासमोरच उपोषण सुरू ठेवले आहे. या दरम्यान तीन ते चार मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे मुलींनी सांगितले.
(शहर प्रतिनिधी)