अतिरिक्त शिक्षक ‘ना घर के ना घाट के’
By Admin | Updated: September 9, 2016 02:45 IST2016-09-09T02:45:17+5:302016-09-09T02:45:17+5:30
खासगी शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या तब्बल सव्वाशे शिक्षकांची अवस्था ‘ना घर के ना घाट के’ अशी झाली आहे.

अतिरिक्त शिक्षक ‘ना घर के ना घाट के’
‘इओं’कडे स्वाक्षऱ्या : संस्थाचालकांचा रुजू करून घेण्यास नकार
यवतमाळ : खासगी शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त ठरलेल्या तब्बल सव्वाशे शिक्षकांची अवस्था ‘ना घर के ना घाट के’ अशी झाली आहे. पूर्वीच्या संस्थांनी कसेतरी त्यांना ‘सोडले’. पण आता नवे संस्थाचालक त्यांना रुजूच करून घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या शिक्षकांनी गुरुवारी शिक्षणाधिकारी कार्यालयात धडक देत न्यायाची मागणी केली.
आॅनलाईन संचमान्यतेमध्ये जिल्ह्यातील खासगी शाळांमधील सव्वाशे शिक्षक अतिरिक्त ठरले. जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यात त्यांना काम न करताच अधांतरी ठेवण्यात आले. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न दोन महिने प्रलंबित राहिला. पण निदान आपल्या पूर्वीच्या शाळेत जाऊन त्यांना ‘मस्टर’वर स्वाक्षरी तरी करता येत होती. अनेक अडथळे पार करत शेवटी ३ सप्टेंबर रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली. यात सव्वाशे शिक्षकांचे समायोजन करताना अनेकांची नाराजी झाली. वणीतील शिक्षकांना उमरखेडच्या शाळेत नियुक्ती देण्यात आली. घाटंजी तालुक्यातील शिक्षकांना पुसद तालुक्यात नियुक्ती मिळाली. ६ सप्टेंबरला हे शिक्षक नव्या संस्थेच्या शाळेत रुजू होण्यासाठी गेले. मात्र तेथील मुख्याध्यापकांनी रुजू करून घेण्यास साफ नकार दिला. दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्यामुळे या शिक्षकांना काय करावे, तेच समजेनासे झाले. शेवटी गुरुवारी या शिक्षकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय गाठले. मात्र, शिक्षणाधिकारी पुण्याला असल्याने शिक्षकांची व्यथा लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनीच ऐकली. जुन्या संस्थेतून ‘रिलिव्ह’ झाले आणि नव्या संस्थेत रुजू होता येत नाही. त्यामुळे आपण नोकरीत आहोत की नाही, अशा अधांतरी अवस्थेत हे शिक्षक आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
रोज यवतमाळला या!
अतिरिक्त शिक्षकांनी गुरुवारी शिक्षणाधिकारी कार्यालय गाठून व्यथा मांडली. तेव्हा शिक्षणाधिकारी वंजारी यांनी फोनवरून कर्मचाऱ्यांना सूचना केली. त्यानुसार, शिक्षणाधिकारी कार्यालयात अतिरिक्त शिक्षकांसाठी मस्टर तयार करण्यात आले. ज्या शिक्षकांना संस्थाचालक रूजू होण्यास नकार देत आहे, त्यांनी दररोज शिक्षणाधिकारी कार्यालयात येऊ त्या मस्टरवर सही करण्याची सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार शिक्षकांनी स्वाक्षऱ्या केल्या. मात्र, वणी, उमरखेड, झरी अशा ठिकाणच्या शिक्षकांना रोज सहीकरिता यवतमाळला येणे शक्य होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.