आदर्श गाव गुजरीमध्ये स्मशानभूमी अभावी उभ्या पिकात करावे लागताहेत अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 05:00 IST2021-08-20T05:00:00+5:302021-08-20T05:00:16+5:30
गावात स्मशानभूमी नसल्याने शेतातील कपाशीचे उभे पीक कापून म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

आदर्श गाव गुजरीमध्ये स्मशानभूमी अभावी उभ्या पिकात करावे लागताहेत अंत्यसंस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : गाव तेथे स्मशानभूमी असा शासनाचा उपक्रम असताना राळेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम गुजरी येथे ग्रामस्थांना उभ्या पिकात अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. स्वातंत्र्यानंतरही येथे स्मशानभूमीची व्यवस्था होऊ शकली नाही, हे दुर्भाग्य आहे.
गुजरी येेेेथे १४ ऑगस्ट रोजी गावातील शेवंताबाई बापूराव वाघाडे (६५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना चार मुले असून तीन एकर शेत त्यांना सिलिंगचे मिळाले आहे. त्यातील दोन एकर शेत त्यांनी आपल्या मुलांच्या नावाने केले, उर्वरित एक एकर शेत स्वतःच्या नावावर ठेवले हाेते. गावात स्मशानभूमी नसल्याने शेतातील कपाशीचे उभे पीक कापून म्हातारीवर अंत्यसंस्कार करावे लागले. किमान ज्याच्याकडे शेत आहे ते अशी व्यवस्था करू शकतात. मात्र भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार कुठे करावा, अशा प्रश्न आहे. गावात ज्यांच्याकडे मृत्यू झाला त्यांना त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी व जागा स्वतः शोधावी लागते. हे या आदर्श ग्राम गुजरी गावाचे वास्तव आहे. म्हातारीच्या वाट्याला आलेल्या एक एकर पिकाचा नायनाट करून तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
या समस्येबाबत ग्रामसेवक व सरपंचांनी अतिशय धक्कादायक माहिती दिली. गट क्रमांक २९१ मधील झीरो ४० आर क्षेत्र स्मशानभूमीकरिता राखीव आहे. परंतु स्थानिक राजकारण व काही लोकांचा विरोध असल्यामुळे या जागेवर अनेक वर्षांपासून स्मशानभूमी उभारता आली नाही. तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतला ही जागा हस्तांतरित करण्यात आली. या जागेवर १३ ऑगस्टला स्मशानभूमीची राखीव जागा म्हणून फलक लावल्याचे ग्रामपंचायत सदस्य अखिल धांडे यांनी सांगितले. स्मशानभूमीकरिता गावात राखीव जागा आहे. दोन वेळा निधी आला, परंतु जागा उपलब्ध न झाल्याने व गावातील राजकारणाने निधी परत गेल्याचे ग्रामसचिव विजया पाटील यांनी सांगितले.
प्रशासनाचा कानाडोळा, राजकारण्यांचे दुर्लक्ष
- आदर्श ग्राम गुजरी येथे गीताचार्य तुकाराम दादा यांनी भेट दिली आहे. या गावाने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेेत. त्यानंतरही येथील स्मशानभूमीची समस्या निकाली निघाली नाही. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे ना राजकारण्यांचे. त्यामुळेच ग्रामस्थांतून कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.