शेतीची परस्पर विक्री करणारे रॅकेट सक्रिय
By Admin | Updated: April 8, 2015 23:57 IST2015-04-08T23:57:15+5:302015-04-08T23:57:15+5:30
तालुक्यातील मुर्धोनी येथील पुंडलिक खोंडे यांची शेती गहाण करून घेण्याच्या नावावर परस्पर विक्री करून खोंडे यांना फसविल्याची घटना उजेडात आली...

शेतीची परस्पर विक्री करणारे रॅकेट सक्रिय
वणी, मारेगाव तालुका : महिनाभरात तीन घटना, पोलिसांसमोर कारवाईचे आव्हान
वणी : तालुक्यातील मुर्धोनी येथील पुंडलिक खोंडे यांची शेती गहाण करून घेण्याच्या नावावर परस्पर विक्री करून खोंडे यांना फसविल्याची घटना उजेडात आली. मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बु.) येथेही देवानंद झिले यांच्या मालकीचे शेत इसारपत्रावर हडपण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. या दोघांनीही आता पोलिसांत धाव घेतली आहे.
मुर्धोनी येथे पुंडलिक खोंडे यांची गट क्रमांक ६४, क्षेत्रफळ ०.९४ हेक्टर आर. शेतजमीन आहे. २०१३-१४ मध्ये शेतीच्या वहितीकरिता ते कर्ज देणाऱ्याच्या शोधात होते. वणी येथील प्रेम तोडकर यांना त्यांनी ही बाब सांगितली. प्रेमने विनोद नक्षिणे रा.कौटा, ता.हिंगणघाट, जि.वर्धा याला त्यांच्या शेतात नेऊन त्यांची ओळख करून दिली. विनोदने खोंडे यांना दोन टक्के व्याजाने दीड लाख रूपये देण्याचे मान्य केले. मात्र त्यापोटी शेताचे गहाणखत करून देण्याची अट ठेवली. खोंडे यांनी शेतीचे गहाणपत्र करून देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार २२ मार्च २०१३ रोजी प्रभुदास विठूजी चिकाटे रा.बावणे ले-आउट, ता.वरोरा, जि.चंद्रपूर याने आपल्या नावे नोंदणीकृत गहाणखत करून घेतले. या व्यवहाराच्या वेळी प्रभुदास चिकाटे, विनोद नक्षिणे याच्यासह विनोद फुलकर रा.हिंगणघाट, प्रेम तोडकर, अशोक चिमनकर रा.हिंगणघाट, विनोद वाटकर रा.जामगाव, जि.चंद्रपूर हे उपस्थित होते, असा दावा खोंडे यांनी केला आहे.
कर्ज घेतल्या रकमेतून खोंडे यांनी शेताची वहिती केली. पीक निघाल्यानंतर पंडलिक खोंडे मुलगा मधुकर खोंडेसह व्याजासह पैसे परत करण्याकरिता वररोरा येथे गेले. तेथे प्रभुदास चिकाटे व विनोद नक्षिणे उपस्थित होते. मात्र चिकाटे याने आपण तुल्हाला व्याजाने पैसे दिले नसून तुमचे शेत मी विकत घेतल्याचे सांगताच खोंडे यांना धक्का बसला. अर्थात गहणखताऐवजी त्यांनी शेताचे थेट विक्रीपत्रच करून घेतल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. चिकाटे याने पैसे परत न घेताच खंडे यांना तेथून हाकलून लावले. तसेच हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेले खोंडे पिता-पुत्र तेथून परतले. त्यांनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन अर्ज करून कागदपत्रे तपासली असता त्यांचे शेत विक्री करून घेतल्याचे कागदपत्र त्यांच्या हाती पडले. आपली जमीन हडपण्याच्या हेतूने चुकीच्या मार्गाने या सर्वांनी शेती विक्री करून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तथापि खोंडे यांनी कुणालाही शेती विक्री करून दिलीच नाही, असा त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे खोंडे यांच्याकडे केवळ तेवढीच शेती आहे. त्या शेतीची विक्री करून खोंडे यांना भूमिहीन होता येत नाही. त्यासाठी तुकडे बांधणी परवानगी घ्यावी लागते. तसेच विक्रीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांचीही परवानगी घ्यावी लागते. मात्र त्यांनी अशी कुठलीही परवानगी घेतली नाही, असा त्यांचा दावा आहे. या शेत विक्रीसाठी खोंडे यांच्या शेतीचा सातबारा न जोडता मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बु.) येथील देवानंद झिले यांच्या शेतीचा बोगस विक्री करून आपल्या नावे केलेला सातबारा या विक्रीसाठी जोडण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. या सहा जणांनी शेती गहाणखत करून देण्याच्या नावावर शेती आपल्या नावे करून फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)
खैरगाव येथे इसारपत्रावरच हडपली शेती
असाच प्रकार मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बु.) येथेही उघडकीस आला. तेथील देवानंद झिले यांच्या शेतीच्या इसारपत्रालाच विक्रीपत्र दर्शवून त्यांची शेती हडपण्यात आल्याची त्यांची तक्रार आहे. खैरगाव येथे झिले यांची गट क्रमांक ४६/३, क्षेत्रफळ ३.0८ हे.आर. भोगवटदार वर्ग एक ही शेतजमीन आहे. या शेतीवर त्यांनी यापूर्वी जिल्हा बँकेकडून कर्जही घेतले होते. त्यांनीही २०१३ मध्ये वरोरा येथील प्रभुदास चिकाटे यांच्याकडून दीड लाख रूपयांचे कर्ज घेतले. त्यावेळी झिले यांनी चिकाटे यांना तेथील दुय्यम निबंधक कार्यालयात १३ फेब्रुवारी २०१३ रोजी इसारपत्र करून दिले. पीक निघाल्यानंतर झिले वरोरा येथे चिकाटे यांच्याकडे दोन ते तिनदा पैसे घेऊन गेले. मात्र त्याने पैसे घेण्यास नकार दिला. तेथून परतल्यानंतर २६ फेब्रुवारी २०१४ रोजी शेतात काम करीत असताना मार्डी येथील जयवंत जुंबडे शेतात आले व हे शेत माझे आहे, तुम्ही इथे काय करता, असे झिले यांना म्हटले. जुंबडे यांच्याजवळील कागदपत्रे पाहिले असता झिले यांच्या शेताच्या इसारपत्राला विक्रीपत्र बनवून प्रभुदास चिकाटे याने ते शेत त्यांना विक्री करून दिल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मारेगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात धाव घेऊन चौकशी केली असता १३ फेब्रुवारी २०१३ रोजी चिकाटे यांना जे इसारपत्र करून दिले, ते इसारपत्र नसून विक्रीपत्र होते, असे त्यांच्या निदर्शनास आले. वास्तविक झिले यांनी चिकाटे यांना शेती विकलीच नव्हती व विक्रीपत्रही करून दिले नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्याकडे दुसरीकडे शेतजमीन नाही. त्यामुळे शेती विक्रीसाठी त्यांनी आवश्यक परवानगीही कुणाकडूनच घेतली नाही. अर्थात इसारपत्रालाच विक्रीपत्र दर्शवून चिकाटे याने त्यांच्या शेतीची विक्री करून फसवणूक केल्याची तक्रार आता त्यांनी केली आहे. यात चिकाटे यांना जयवंत जुंबडे रा.मार्डी, अशोक मोतिराम चिमणकर रा.हिंगणघाट, जि.वर्धा, विनोद मधुकर वाटकर रा.जामगाव, जि.चंद्रपूर, नीलेश रमेश निखट रा.बांबर्डा, ता.मारेगाव व संदीप केशव झोटींग रा.खैरगाव ता.मारेगाव यांनी शेती हडपण्यासाठी मदत केल्याचा दावा केला आहे.
वणी तालुक्यात गुन्हे झाले दाखल
यापूर्वी वणी तालुक्यातील शिरपूर येथील शिखरे नामक वृद्ध शेतकऱ्याची शेती हडपण्याचा प्रकारही नुकताच उघडकीस आला होता. त्यांच्या वृद्धत्त्वाचा लाभ घेत काहींनी त्यांच्याऐवजी दुसऱ्याच वृद्धाला दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित करून त्यांची शेती हडपण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी शिखरे यांच्या मतदार छायाचित्राचा वापर करण्यात आला होता. मात्र ही बाब लक्षात येताच त्यांची शिरपूर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली होती. पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही केली होती. त्यामुळे वणी व मारेगाव तालुक्यात गहाणखत, इसारपत्र, बनावट कागदपत्रांच्या आधारावर शेती हडपणारे टोळकेच सक्रिय झाल्याचे दिसत आहे. दुय्यक निबंधक कार्यालयाने कागदपत्रांची सत्यता पडताळून पहिल्यानंतर, तथा संबंधित शेतकऱ्यांना समोरासमोर खरी माहिती विचारूनच, अशी प्रकरणे नोंदणीकृत करण्याची गरज आहे.