केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास कारवाई
By Admin | Updated: February 18, 2017 00:36 IST2017-02-18T00:36:51+5:302017-02-18T00:36:51+5:30
लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास

केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास कारवाई
दहावी, बारावी परीक्षा तयारीचा आढावा : भरारी पथकांना केले अधिक क्रियाशील
यवतमाळ : लवकरच दहावी, बारावीच्या परीक्षा होऊ घातल्या आहेत. परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळून आल्यास सबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी दिले. दहावी, बारावीच्या परीक्षेच्या तयारीचा आढावा सभेत ते बोलत होते.
दहावी, बारावीच्या परीक्षा संपूर्णलणे कॉपीमुक्त वातावरणात पडाव्या. परीक्षा केंद्रावर कॉपी करणे किंवा त्यासाठी सहकार्य करणे गुन्हा आहे. असे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
परीक्षा पार पाडण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या दक्षता समितीची सभा महसूल भवन येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, शिक्षणाधिकारी माध्यमिक चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक सुचिता पाटेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गायनर, निरंतर शिक्षणाधिकारी अंबादास पेंदोर आदी उपस्थित होते.
बारावीची परीक्षा २८ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या परीक्षेचे जिल्ह्यात १०४ केंद्र असून ३५ हजार ५०२ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दहावीची परीक्षा सात मार्चपासून सुरू होत आहे. त्यासाठी १४९ केंद्रांवरून ४३ हजार ८६३ विद्यार्थी परीक्षा देतील. या केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी बैठे पथके, भरारी पथके नेमन्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. भरारी पथकांमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी अशा अधिकाऱ्यांचा समावेश राहिल. तर बैठे पथकात मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषि विस्तार अधिकाऱ्यांचा समावेश करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
परिक्षा केंद्रावर त्याच शाळेच्या मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुख म्हणून नेमू नये तसेच परीक्षा केंद्रावर संबंधित शाळांच्या शिक्षकांना नेमू नये असेही त्यांनी सांगितले. केंद्रावर तीन तासाच्या दरम्यान वेगवेगळ्या भरारी पथकांच्या भेटी होतील. किमान तीनदा प्रत्येक केंद्रावर भेटी होतील, असे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. पर्यवेक्षक किंवा अन्य परीक्षा कर्मचारी, अधिकाऱ्यांनी गैरप्रकारासाठी सहकार्य केल्यास त्यांच्यावरही फौजदारी दाखल करावी, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)