कोलडेपोंवरील कारवाई थंडबस्त्यात

By Admin | Updated: August 14, 2016 00:52 IST2016-08-14T00:52:12+5:302016-08-14T00:52:12+5:30

प्रदूषण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या येथील १५ कोलडेपोधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र देऊन कोलडेपो बंद करण्याचे आदेश दिले...

Action on Coedepeps | कोलडेपोंवरील कारवाई थंडबस्त्यात

कोलडेपोंवरील कारवाई थंडबस्त्यात

पत्र देऊन ‘एमपीसीबी’ गप्प : वीज वितरणची कोलडेपोधारकांना नोटीस, वीज पुरवठा बंद होणार
वणी : प्रदूषण वाढविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या येथील १५ कोलडेपोधारकांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र देऊन कोलडेपो बंद करण्याचे आदेश दिले खरे, पण आता ही कारवाई नेमकी करायची कुणी, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला पडला आहे. कोलडेपोधारकांना पत्र देऊन पंधरवडा उलटला. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येथे येऊन अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीने मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सांगण्यावरून संबंधित कोलडेपोधारकांना वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटीस बजावली आहे. मात्र संबंधित कोलडेपोधरकांचे ग्राहक क्रमांक शोधण्यातच वीज वितरण कंपनीचा वेळ जात आहे.
२८ जुलैै रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वणी उपविभागीय कार्यालयामार्फत कोल डेपो संचालकांना कोलडेपो बंद करण्याबाबत पत्र दिले. बंद होणार असलेल्या कोलडेपोंमध्ये मनिष श्यामसुंदर बत्रा, चंदा अनिल लहरिया, प्रशांत प्रविण जैन, शब्बीर बेग जमिर बेग, हरिष देवकिशन भट्टड, सुनिल रामनारायण भट्टड, लिलाधर श्यामसुंदर अग्रवाल, गोविंद रामचंद्र मोदी, विजयकुमार गुलाबचंद चांडक, अशोक जगन्नाथ केला, महावीन कोल प्रा.लि., मातोश्री ट्रेडर्स, बाजोरिया ट्रेडिंग कार्पोरेशन, के.के.एंटरप्राईजेस, पुरूषोत्तम रामलख मालू यांच्या कोलडेपोचा समावेश आहे.
कोलडेपोंसोबतच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वीज वितरण कंपनीला पत्र देऊन संबंधित कोलडेपोंचा वीज पुरवठा बंद करण्याबाबत सूचना केली. तसेच ज्या ग्रामपंचायत हद्दीत हे कोलडेपो येतात, त्या ग्रामपंचायतींना या कोलडेपोंचा पाणी पुरवठादेखील बंद करण्याचे आदेश दिले. एवढ्याच कारवाईवर सध्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ थांबले आहे. कोलडेपोंना पत्र दिल्यानंतर महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रत्यक्ष येथे येऊन कोलडेपो बंद करण्याची कारवाई करतील, अशी अपेक्षा स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांना होती. मात्र तसे न घडल्याने अधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून होत असलेली धिम्यागतीची कारवाई सामान्यांना बुचकळ्यात टाकणारी आहे. वणी- यवतमाळ मार्गावर असलेल्या या कोलडेपोंमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढले आहे. नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वारंवार सूचना देऊनही कोलडेपोधारकांकडून प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Action on Coedepeps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.