शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा

By Admin | Updated: June 7, 2017 00:58 IST2017-06-07T00:58:50+5:302017-06-07T00:58:50+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्व विषय बाजूला सारून प्रथम संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देण्यात आला.

Accept the demands of the farmers | शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा

जिल्हा परिषदेत ठराव : भारत निर्माण, हरियालीतील अपहार सर्वसाधारण सभेत गाजला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंगळवारी सर्व विषय बाजूला सारून प्रथम संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा देण्यात आला. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मंजूर करण्यासंबंधीचा ठराव एकमताने पारित करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा सुरू होताच काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी सर्व परंपरा आणि विषय बाजूला सारत शेतकऱ्यांच्या संपाचा मुद्दा उपस्थित केला. शेतकरी संपावर का गेले, कोणत्या सरकारने काय केले, याच्या खोलात न जाता सर्व सदस्यांनी जगाच्या पोशिंद्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या मागण्या त्वरित मंजूर करून घेण्यासाठी ठरावाला समर्थन द्यावे, अशी विनंती त्यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी मंजुरी बहाल करून सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या त्वरित मंजूर करण्याचा ठराव एकमताने पारित केला. दरम्यान, यापूर्वीच्या सभेतही सदस्यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, असा ठराव पारित केला होता. त्या ठरावाचे काय झाले, अशी पृच्छाही सदस्यांनी केली.
यानंतर प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. स्वाती येंडे यांनी शेतकऱ्यांना अद्याप ५०० कोटींची दुष्काळी मदत मिळाली नसल्याकडे लक्ष वेधले. शिवसेना सदस्यांनी बोगस अपंग शिक्षक किती, लाभ घेणारे किती, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रथामिक शिक्षणाधिकारी डॉ. संचिता पाटेकर यांनी २०१३-१४ मध्ये १०४ शिक्षकांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून बदलीत लाभ घेतल्याचे सांगितले. चार शिक्षक न्यायालयात गेले असून आता अपंगत्वावे प्रमाणपत्र सादर करून लाभ घेणाऱ्या शिक्षकांची नागपूर येथे तपासणी करणार असल्याचे सीईओ डॉ. दीपक सिंगला यांनी सांगितले.
पती-पत्नी एकत्रिकरणावरून सदस्यांनी शिक्षणला कोंडीत पकडले. शाळा डिजीटल करण्यापेक्षा सर्व शाळांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. बोरगाव येथील शासकीय निवासस्थानी सोयाबिन साठविणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केल्याची घोषणा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के. झेड. राठोड यांनी केली. त्यांची खाते चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. अंगणवाडी बांधकाम, कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बरगे, बळीराजा चेतना अभियानातील अपहार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, पाणी टंचाई, भारत निर्माण योजना आदी विषयांवरून सभेत प्रश्नांची सरबत्ती झाली. सदस्यांनी यापुढे बांधकामची सर्व अंदाजपत्रके मराठीत द्यावीत, अशी मागणी केली.
आरोग्य, शिक्षणमध्ये पदे रिक्त
आरोग्य विभागात तब्बल २४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना तर अद्याप वैद्यकीय अधिकारीच नाही. शिक्षण विभागातही शिक्षकांची ६५ पदे रिक्त आहेत.

हरियालीत ६१ लाखांचा अपहार
उमरखेड व महागाव तालुक्यात हरियाली वृक्ष लागवडीत तब्बल ६१ लाखांचा अपहार झाल्याचा मुद्दा सभागृहात गाजला. वृक्ष लागवड झाली, नंतर वृक्ष जिवंतच राहिले नाही. यात चौकशीअंती ६१ लाखांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. संबंधितांकडून ती वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सभेत सांगण्यात आले. चित्तरंजन कोल्हे यांनी भारत निर्माण योजनेतील कामे गेल्या १० वर्षांपासून रखडल्याचे सांगून हा निधी ग्रामपंचायतीकडे वळता करण्याची सूचना केली. सीइओंनी भारत निर्माणच्या २९ योजना पूर्ण झाल्या असून १७ योजना अपूर्ण असल्याचे सांगितले.

Web Title: Accept the demands of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.