लोकमत न्यूज नेटवर्क, वणी (यवतमाळ): शुक्रवारी वणी परिसराला भीषण वादळाचा तडाखा बसला. या वादळात अनेक ठिकाणचे टिनपत्र्याचे शेड उडून गेले, काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीज खांब वाकले. यामुळे सायंकाळी ५.३० वाजता खंडित झालेला वणी शहरातील वीज पुरवठा शनिवारी पहाटे ३ वाजता सुरू झाला. परिणामी वणीकरांना अख्खी रात्र प्रचंड उकाड्यात जागरण करत काढावी लागली.
गेल्या अनेक दशकांत पहिल्यांदाच असे भीषण वादळ पाहिल्याचे जाणकार सांगतात. शुक्रवारी संध्याकाळी वणी व परिसरात सुमारे एक तास हे वादळ घोंघावले. वणी शहरातील जत्रा मैदानात सुरु असलेल्या यात्रेला व बैलबाजाराला याचा चांगलाच फटका बसला. वणी शहरासह काही भागात हे वादळ होते. या वादळाचा फळबागांना चांगलाच फटका बसला. मंदर येथील आमराईचे मोठे नुकसान झाले.
शुकवारी दि. १८ एप्रिल रोजी दुपारी वणी शहरात कडक ऊन होते. मात्र संध्याकाळी आकाशात अचानक ढगांनी गर्दी केली. त्यानंतर आकाशात वादळ घोंगावू लागले. वेगवान वादळामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर वादळी वा-यासह पाऊस सुरु झाला. वादळी वा-यामुळे वणीतील काही परिसरातील घरांवरची टिनपत्रे उडाली. फुटपाथवर असलेल्या व्यावसायिकांचे साहित्य उडाले. काही कवेलुंच्या घरातील कवेलूंची नासधूस झाली. वादळाचा वेग इतका भयंकर होता की काही ऑफिसच्या कॅबिनच्या काचा देखील वादळामुळे फुटल्याची माहिती आहे. वणी शहरालगत असलेल्या शेतातील गोठ्यातील टिन उडाले. यासह अनेक झाडे उन्मळून पडली. तर काही झाडांच्या फांद्या तुटल्या. काही फांद्या व झाड ईलेक्ट्रीक पोलवर पडले. रस्त्यावरील अनेक झाडे कोसळली.
वादळाचा तडाखा इतका होता की वादळाने टिनपत्रे, झाडांच्या फांद्या तसेच अनेक वस्तू आपल्या कवेत घेतल्या. याचवेळी चारगाव चौकी जवळ काही दुचाकीस्वार वणीच्या दिशेने येत होते. वादळापासून स्वतःला वाचविण्यासाठी या दुचाकीस्वारांनी ट्रकखाली आसरा घेतला. वादळात टिनपत्रे उडताना त्यांनी बघितले. तसेच त्यांच्या डोळ्यादेखत पेट्रोल पम्पच्या कार्यालयाच्या कॅबिनची काच फुटली. तर चारगाव चौकीवरील दुस-या पेट्रोल पम्पच्या कार्यालयावर झाड कोसळले. हे वादळ इतके भयंकर होते की रस्त्याच्या कडेला जर आसरा घेण्यास ट्रक नसते, तर कदाचित जीवितहानी झाली असती.