वणी पालिकेच्या पार्किंगमध्ये उभी कार पेटली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 17:28 IST2023-04-25T17:27:34+5:302023-04-25T17:28:32+5:30
आगीचे कारण अस्पष्ट

वणी पालिकेच्या पार्किंगमध्ये उभी कार पेटली
संतोष कुंडकर
वणी (यवतमाळ) : येथील नगरपरिषदेच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारने मंगळवारी दुपारी अचानक पेट घेतला. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. कार पेटल्याची बाब लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी पाण्याचा वापर करीत ही आग आटोक्यात आणली. मात्र या दुर्घटनेत कारचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील एक कुटुंब वणी येथे खरेदीसाठी आले होते. येथे पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांची कार नगरपरिषदेच्या पार्किंग झोनमध्ये उभी केली. त्यानंतर ते तेथून निघून गेले. मात्र काही वेळातच कारच्या बोनेटमधून धूर निघत असल्याची बाब काही नागरिकांच्या लक्षात आली. नागरिकांनी धावपळ करून कारच्या बोनेटवर पाण्याचा मारा केला. याचवेळी अग्निशमन दलालाही या घटनेची माहिती देण्यात आली. लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
अथक परिश्रम करून या आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग नेमकी कशामुळे लागली, हे मात्र कळू शकले नाही. उन्हाळ्याच्या दिवसात प्रवास करताना अनेकदा वाहनाचे इंजिन गरम होते. यातून वाहन पेटण्याची शक्यता अधिक असते, असाच काहीसा प्रकार या कारबाबत झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.