गिरीश महाजनांचे नाव सांगत घातला २८ लाखाने गंडा
By सुरेंद्र राऊत | Updated: April 14, 2025 18:29 IST2025-04-14T18:27:57+5:302025-04-14T18:29:28+5:30
महिलेसह पाच जणांवर गुन्हा : रेल्वेत नोकरीचे दिले आमिष

A man was robbed of Rs 28 lakhs by mentioning Girish Mahajan's name.
सुरेंद्र राऊत
पुसद (यवतमाळ) : मंत्री गिरीष महाजन यांचा वाहन चालक असून त्यांच्यामार्फत रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष देऊन दोन भावांची पाच जणांच्या टोळीने २८ लाख ५० हजार रुपयांनी फसवणूक केली. पुसद तालुक्यातील दोन भावांनी या प्रकरणी खंडाळा पोलिस ठाण्यात महिलेसह पाच जणांविरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे.
निलेश साहेबराव राठोड (३५), संदीप तुळशीराम आडे (३२) दोघे रा. बोरनगर, ता. पुसद, रिधीर भिका जाधव (३८), लता रिधीर जाधव (३५), दोघेही रा. एनए सावंत मार्ग, फायर स्टेशन व्हीटीसी, कुलाबा, मुंबई, रितेश उत्तम पवार (३२) रा. मुंबई अशी आरोपींची नावे आहेत.
तालुक्यातील माळपठारावरील हनवतखेडा येथील अंकुश प्रेमदास चव्हाण व सुमित परशराम चव्हाण रा. आदर्शनगर हे दोघे चुलत भाऊ नोकरीच्या शोधात असताना त्यांची संदीप व निलेश यांच्याशी भेट झाली. त्यांनी रिधीर व त्याची पत्नी लता यांच्यासोबत फोनवर बोलणे करून दिले. रिधीर याने सांगितले की, तो मंत्र्यांच्या कारवर चालक आहे. तुमच्या नोकरीबद्दल बोललो आहे. तुमचे काम करून देतो, असे सांगून अंकुशकडे १३ लाख ५० हजार व सुमीतकडून १५ लाख रुपयांची मागणी केली. अगोदर अर्धे पैसे व नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर उर्वरित रक्कम द्यावी लागेल असे ठरले. अंकुश व सुमितने संबंधितांच्या खात्यात २८ लाख ५० हजार रुपये पाठविले. नंतर त्या दोघांना १५ फेब्रुवारी रोजी पोस्टाने रेल्वेचे नियुक्तीपत्र प्राप्त झाले. ते दोघे मुंबईत नोकरीवर रुजू होण्यासाठी गेले असता तेथे त्यांच्या सारखेच नियुक्तीपत्र असलेली काही मुले होती. त्या पाच ठगांनी या मुलांना खोली करून राहण्यास सांगितले. तीन महिने वाट पाहूनही नियुक्ती मिळाली नाही. अखेर खर्चाला पैसे नसल्याने अंकुश व सुमित गावी परत आले. त्यांनी फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरोधात खंडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली.