वीज उपकेंद्रात आगीचा उडाला भडका; ५० लाखांवर नुकसान : १५ ते २० गावांच्या वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 18:31 IST2023-08-11T18:31:29+5:302023-08-11T18:31:47+5:30
ग्रामीण भागाला वीज पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या वीज उपकेंद्रातच प्रचंड आग भडकली.

वीज उपकेंद्रात आगीचा उडाला भडका; ५० लाखांवर नुकसान : १५ ते २० गावांच्या वीज पुरवठ्याचा गंभीर प्रश्न
उत्तम चिंचोळकर/गुंज
गुंज (यवतमाळ) : ग्रामीण भागाला वीज पुरवठ्याची जबाबदारी असलेल्या वीज उपकेंद्रातच प्रचंड आग भडकली. शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील गुंज येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रात हा आगडोंब उसळला होता. या आगीत मुख्य ट्रान्सफार्मरच जळून खाक झाले आहे.
शॉट सर्कीटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ३३ केव्ही उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफार्मर खाक झाले आहे. ट्रान्सफॉर्मरने मोठा पेट घेतल्यामुळे आगीचे लोळ उठले. पाच किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. या ट्रान्सफार्मरवरून परिसरातील १५ ते २० गावांना वीज पुरवठा केला जातो. मात्र मुख्य ट्रॉन्सफॉर्मरलाच आग लागली. नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसेपर्यंत वीज पुरवठा खंडीत राहणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु जवळच्या उपकेंद्रातून तात्पुरता वीज पुरवठा करण्याचे प्रयत्न वीज वितरण कंपनीचे अधिकारी करीत आहेत.
आग विझविण्यासाठी पुसद नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलाने काही तास प्रयत्न केल्यानंतर सायंकाळी ही आग आटोक्यात आली. तोपर्यंत मुख्य ट्रान्सफार्मर खाक झाले. मात्र आग आटोक्यात आल्याने पुढील गंभीर हानी टळली. अन्यथा याच ३३ केव्ही उपकेंद्राला लागून असलेले १३२ केव्ही उपकेंद्रही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडण्याचा धोका होता. घटनास्थळी महागाव येथील सहायक अभियंता, पुसद येथील कार्यकारी अभियंता दाखल झाले होते. आगीत वीज वितरण कंपनीचे ५० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे कार्यकारी अभियंता आडे यांनी सांगितले.