चाँद खॉची कबुली : वन, ई-वर्ग, आदिवासींच्या जमिनीवर अवैध वृक्षतोडयवतमाळ : यवतमाळ वन विभागात सुमारे ८० लाख रुपये किंमतीच्या दोनशे घनमीटर सागवानाची अवैधरीत्या तोड केली. ते १४ ट्रक सागवान नागपूर व हैदराबादमध्ये तस्करीद्वारे पोहोचविल्याची कबुली सागवान तस्कर चाँद खॉ याने पांढरकवडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यापुढे दिली आहे. या कबुलीने वन खात्यात खळबळ निर्माण झाली आहे. पिंपळखुटी राज्य सीमा चेक पोस्टवर १४ आॅक्टोबर रोजी एम.एच-२९-टी-१४०९ क्रमांकाचा ट्रक पांढरकवडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी पकडला. त्यातून सागवानाचे २८४ नग (१५.९१२ घनमीटर) जप्त करण्यात आले. वन गुन्हा दाखल करून तपास केला असता आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली. त्यात ४ डिसेंबर रोजी शेख चाँद शेख रहेमान (यवतमाळ) हा मुख्य सूत्रधार वन विभागापुढे शरण आला. त्याच्या कबुलीने वन अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारले. चाँद खॉने दिलेल्या बयानानुसार, त्याने यवतमाळ वन विभागांतर्गत संरक्षित वन क्षेत्र, महसूल, ई-वर्ग जमीन, खासगी व आदिवासींच्या जमिनीवरील सागवानाची तोड केली. १४ ट्रकद्वारे हे सागवान हैदराबाद व नागपुरात पाठविण्यात आले. सुमारे दोनशे घनमीटर हे सागवान असून त्याची बाजारभावानुसार किंमत ८० लाख रुपये आहे. पांढरकवडा वन विभागाने केलेल्या चौकशीत ८५० पेक्षा अधिक परिपक्व सागवान वृक्षांची तोड झाल्याचे आढळून आले. विशेष असे हे सागवान परप्रांतात नेण्यासाठी खास क्रमांक ४ चे बनावट हॅमर लावण्यात आले. मात्र हा हॅमर वैध असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. वैध मालासोबत अवैध माल समाविष्ठ करून वाहतूक केली गेली. रहदारी पासमध्ये अतिरिक्त माल नमूद करण्यासाठी वन मजुराच्या हस्ताक्षराचा वापर हेतुपुरस्सरपणे केला गेला. वनपालाने हे षडयंत्र रचले होते. आदिवासींच्या मालकीच्या शेतातील सागवान खासगी बाजारात विकण्याची परवानगी नसताना तो विकला गेला. सरकारी जागेवरील मालमत्तेची ही चोरी केली गेली. ई-वर्ग जमीन वनविभागाला केव्हाच हस्तांतरित झाली आहे. त्याची ताबा पावती आणि सातबारासुद्धा वन विभागाच्या नावे आहे. मात्र यवतमाळचा वन विभाग त्यापासून अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात केवळ वन मजुरावर कारवाई केली गेली असली तरी प्रत्यक्षात बोगस हॅमर, मात्रा वाढविण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्याच्या हस्ताक्षराचा पूर्वनियोजित वापर पाहता या अवैध वृक्षतोडीत वन खात्यातील अनेक हात गुंतलेले असल्याचे दिसून येते. आता त्यांच्यावर केव्हा कारवाई होणार याकडे नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) सखोल चौकशीचे श्रेय पांढरकवडाचे डीएफओ जी. गुरुप्रसाद यांना पांढरकवडा आरएफओने केलेली सखोल चौकशी, सूत्रधारासह सात आरोपींची अटक, १४ ट्रक सागवान तोड व तस्करीची कबुली या संपूर्ण कार्यवाहीचे श्रेय पांढरकवडा येथील थेट आयएफएस उपवनसंरक्षक जी.गुरुप्रसाद यांना दिले जात आहे. गुरुप्रसाद यांचा नॉनकरप्ट व पारदर्शक कारभार, वनांबाबत त्यांची तळमळ आणि अभ्यास यामुळेच सागवान तोडीची ही चौकशी खोलात होऊ शकल्याचे सांगितले जाते. यवतमाळचे डीएफओ प्रमोद लाकरा हेसुद्धा नॉनकरप्ट आहेत. मात्र त्यांचा वन खात्याबाबतचा अभ्यास कमी पडत असल्याने त्यांची अधिनस्त यंत्रणा त्यांच्या साधेपणाचा फायदा उठवीत असल्याचे दिसून येते. सागवान तस्करीतील पैशाने मुजोर झालेली वन खात्याची यंत्रणा यवतमाळचे डीएफओ आणि मुख्य वनसंरक्षकांनाही जुमानत नसल्याचे वनवर्तुळात बोलले जाते. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या पाच-दहा वर्षात झालेल्या संपूर्ण वृक्षतोडीची, वन गुन्ह्यांची आणि शिकारीच्या तसेच मालकी प्रकरणांची चौकशी जी.गुरूप्रसाद यांच्याकडे ‘मिशन’ म्हणून दिल्यास वृक्षतोडीतील भयान वास्तव पुढे येण्यास वेळ लागणार नाही. यवतमाळचे सीसीएफ व डीएफओंनी यापूर्वी अनेकदा वन विभागातील विविध प्रकरणांच्या चौकशीचा देखावा निर्माण केला. मात्र प्रत्यक्षात त्याचे ‘रिझल्ट’ कधीच पुढे आले नाही. या चौकशीच्या अहवालातच पाणी मुरले. त्या तुलनेत जी.गुरुप्रसाद यांची चौकशी आणि एकूणच कामकाज ‘रिझल्ट ओरिएन्टेड’ असल्याचे दिसून येते.
८० लाखांची सागवान तस्करी
By admin | Updated: December 17, 2015 02:23 IST