दिव्यांगांसाठी ७५ लाख रुपये राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 22:59 IST2017-08-13T22:59:11+5:302017-08-13T22:59:33+5:30
उत्पन्नाच्या तीन टक्के निधी नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी राखीव ठेवला आहे. ही रक्कम ७५ लाख रुपये आहे.

दिव्यांगांसाठी ७५ लाख रुपये राखीव
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उत्पन्नाच्या तीन टक्के निधी नगरपरिषदेने दिव्यांगांसाठी राखीव ठेवला आहे. ही रक्कम ७५ लाख रुपये आहे. या निधीतून दिव्यांगांसाठी सर्वसाधारण सभेत धोरणात्मक निर्णय घेतला जाऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येईल, असे नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी येथे आयोजित दिव्यांगांच्या मेळाव्यात सांगितले.
नगरपरिषदेतर्फे दिव्यांगांसाठी स्थानिक पाटीपुरा भागातील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरपरिषद आयुर्वेद रुग्णालयात दिव्यांग कल्याण कक्षाची स्थापना करण्यात आली. या कक्षातर्फे नगरभवनात मेळावा घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानाहून नगराध्यक्ष कांचन चौधरी बोलत होत्या.
यावेळी मंचावर सभापती सुषमा राऊत, रिता धावतोडे, स्थायी समिती सदस्य जगदीश वाधवाणी, रेखा कोठेकर आदींची उपस्थिती होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियान मुंबईचे सुहास चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी प्रास्ताविक केले. दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची माहिती त्यांनी दिली. प्राथमिक स्वरूपाच्या गरजा, योजना आणि दिव्यांगांना लागणारे साहित्य याबाबतची कारवाई तत्काळ केली जाईल, याची सुरुवात १५ आॅगस्ट रोजी यवतमाळ बसस्थानकावर चार व्हील चेअर दिव्यांगांच्या सोयीसाठी देऊन केली जाईल, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाचे व्यवस्थापक तारे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी मंगला मून आदींनी समयोचित मार्गदर्शन केले. दीपक राजा, सोनटक्के, हिरामण दिवेकर, ताई उईके आदींनी मनोगत व्यक्त केले. संचालन व आभार दिव्यांग कक्ष प्रमुख डॉ. विजय अग्रवाल यांनी केले. यशस्वीतेसाठी डी.एन. जैन, विनोद मदनकर, लीलाधर दहीकर, सुनीता तिवारी, अशोक लोहकरे आदींनी पुढाकार घेतला.