उपविभागातील ७० गावे अंधारात
By Admin | Updated: May 29, 2017 00:42 IST2017-05-29T00:42:54+5:302017-05-29T00:42:54+5:30
वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले.

उपविभागातील ७० गावे अंधारात
१३५ विद्युत खांब जमीनदोस्त : महावितरणचे २० लाखांचे नुकसान, पावसाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्याला शनिवारी सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले. या वादळामुळे उपविभागातील ७० गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला असून तब्बल १३५ विद्युत खांब वाकले आहे. यात महावितरणचे जवळपास २० लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी सायंकाळी आकाशात ढग दाटून आले होते. त्यानंतर काही वेळाताच सोसाट्याचा वाराही सुटला व अचानक दमदार पावसाने हजेरी लावली. या पवसाचा वेग इतका तीव्र होता की, समोरून येणारे कोणतेही वाहन दृष्टीस पडत नव्हते. त्याचबरोबर वाऱ्याचा वेगही इतका जबरदस्त होता की, वणी येथील विश्रामगृहावरील संपूर्ण छप्पर व पोलीस ठाण्यातील सौर यंत्रणाही कोलमडून पडली. वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा विभागात या वादळी वाऱ्यामुळे जवळपास १३५ विद्युत खांब कोसळले. त्यामुळे या चारही तालुक्यातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
शनिवारी रात्रीच काही अभियंते व कर्मचाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधारामुळे पुरवठा सुरळीत करण्यास अडथळा येत होता. खांब मोडून खाली पडल्यामुळे ताराही जमिनीवर लोंबकळत होत्या. रविवारी सकाळीच या चारही तालुक्यातील विद्युत केंद्र व उपकेंद्रातील कर्मचारी, अधिकारी, कंत्राटदारांच्या कामगारांनी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. रविवारी दुपारपर्यंत बहुतांश गावातील विद्युत पुरवठा सुरू झाला होता. मात्र शनिवारी रात्री तब्बल ७० गावांना अंधारातच रात्र काढावी लागली.
रविवारी दुपारपर्यंतही वीज पुरवठा सुरळीत न झाल्यामुळे गावखेड्यातील नळयोजनेवर त्याचा चांगलाच परिणाम झाला. सध्या विहिरीची पातळी खोल गेल्याने गावकऱ्यांना नळ योजनेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. मात्र रविवारी पाणी पुरवठा न झाल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागले. या वादळी वाऱ्यामुळे वणी, मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यातील सर्व मार्गावरील झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे रात्रीच्यावेळी चालकांना वाट काढताना नाहक त्रास सहन करावा लागला.
झरी तालुक्यात सध्या भूईमुग काढण्याचे काम सुरू होते. भूईमुग काल्यानंतर शेतकऱ्यांना कुटाराचा शेतातच ढिग लावला होता. या कुटाराचा जनावरांच्या चाऱ्यासाठी वापर करण्यात येणार होता. मात्र पावसामुळे हा कुटार ओला झाला असून तो आता बिनकामाचा झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकंदरीत शनिवारी बरसलेल्या या पावसामुळे अनेकांना नुकसानीचा फटका बसला आहे.