7% water reservoir in Isapur dam followed by Pus Dam | पूस धरणापाठोपाठ इसापूर धरणातही ५५ टक्के जलसाठा

पूस धरणापाठोपाठ इसापूर धरणातही ५५ टक्के जलसाठा

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा परिणाम । रबी पिकांच्या सिंचनासाठी शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : जूनपूर्वी पूस आणि इसापूर या दोन्ही मोठ्या धरणांमध्ये जलसाठा अत्यल्प उरला होता. त्यामुळे परिसरातील शेतीसिंचनाचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. मात्री एकीकडे परतीच्या पावसाने खरिपातील पिकांना मोठा फटका दिला असला तरी याच पावसामुळे पूसपाठोपाठ इसापूर धरणातील जलसाठाही वाढला आहे. त्यामुळे किमान रब्बी हंगामातील पीक घेण्याची शेतकऱ्यांची आशा वाढली आहे.
पूस धरणात परतीच्या पावसामुळे ८० टक्के जलसाठा निर्माण झाला असून त्याचबरोबर इसापूर धरणातसुद्धा ५५ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यात भरपूर पाऊस पडत असल्याने पैनगंगा नदीवर असलेल्या इसापूर धरणात पाण्याचा ओढा चालूच आहे. इसापूर धरण हे मोठे धरण असून यावर विदर्भातील सुमारे १५ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येते. तसेच मराठवाड्यातील सुमारे ९१ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. सुरुवातीच्या पावसाने दगा दिल्यामुळे इसापूर धरणाच्या पातळीने निचांक गाठला होता. परंतु परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने या धरणात प्रचंड प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असल्याने आजमितीस धरणात ५५ टक्के जलसंचय निर्माण झाला आहे. यामुळे रब्बीतील पिकाच्या सिंचनासाठी शेतकरी सुखावला आहे. मातीच्या बांधकामातील उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील इसापूर धरण हे महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकाचे प्रमुख धरण असून त्याची संपूर्ण जलाशय पातळी ४४१ मीटर आहे. आजमितीस पाणीपातळी ४३६ मीटर असून यावर्षीच्या कमी पावसाने रब्बीतील पिकांसाठी पाणी मिळणे अवघड असल्याचे वाटत होते. मात्र पावसाळ्याच्या शेवटच्या अंकात पावसाने खरीप पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले असले तरी शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी आशा निर्माण केली आहे.

जूनमध्ये होता केवळ मृत जलसाठा
मागील वर्षी कमी पर्जन्यमानामुळे इसापूर धरणात अत्यल्प पाणीसाठा होता. जेमतेमच भरलेल्या या धरणात जून महिन्यापूर्वी केवळ मृत जलसाठाच शिल्लक राहिला होता. मात्र आता परतीच्या पावसाच्या धडाक्याने इसापूर धरणात ५५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील परिसरातील शेतकºयांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.

Web Title: 7% water reservoir in Isapur dam followed by Pus Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.