महामॅरेथॉनमध्ये धावला वणीतील ६७ वर्षांचा तरूण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:16+5:30
नामदेव श्रावण जेनेकर असे या मॅरेथॉनपटूचे नाव असून ते स्थानिक विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जगन्नाथ महाराज विद्यालयाचे ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ‘लोकमत’मधून या महामॅरेथॉनची माहिती मिळाल्यानंतर नागपूर येथे जाऊन नोंदणी केली.

महामॅरेथॉनमध्ये धावला वणीतील ६७ वर्षांचा तरूण
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे रविवारी नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठ क्रीडांगणावर पार पडलेल्या प्लास्टो नागपूर महामॅरेथॉनमध्ये वणीतील ६७ वर्षीय तरूण सेवानिवृत्त मुख्याध्यापकांनी भाग घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. यात त्यांनी तीन किलोमिटरचे अंतर पार करून पदक पटकाविले.
नामदेव श्रावण जेनेकर असे या मॅरेथॉनपटूचे नाव असून ते स्थानिक विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जगन्नाथ महाराज विद्यालयाचे ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ‘लोकमत’मधून या महामॅरेथॉनची माहिती मिळाल्यानंतर नागपूर येथे जाऊन नोंदणी केली. हजारोंमध्ये मीदेखील उत्साहाने सहभागी होत तीन किलोमिटरचे अंतर अगदी पार केले. धावताना कोणताही त्रास झाला नसल्याचे नामदेव जेनेकर यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. सदृढ आरोग्यासाठी सर्वांनीच धावले पाहिजे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. वयाच्या पन्नाशीपर्यंत मी दररोज व्हालीबॉल खेळत असे, अशी माहितीही त्यांनी दिली.
मी धावण्याचा सराव करीत नसलो तरी दररोज किमान तीन किलोमिटर न चुकता पायदळ फिरतो. ठराविक योगासने करतो. नामदेव जेनेकर यांना शैक्षणिक कार्यासाठी सन २००० मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच हरितसेनेचा पुरस्कारदेखील त्यांनी प्राप्त केला आहे. नामदेव जेनेकर यांना सामाजिक कार्याची आवड असून सेवानिवृत्तीच्या काळात सामाजिक कार्यासोबतच ते शेती व्यवसायही सांभाळत आहेत.
खेळण्याच्या आवडीतूनच वेगाव येथे मी स्वत: पुढाकार घेऊन समता क्रीडा मंडळाची स्थापना केली. त्यातून खेळाडू तयार झालेत. सुदृढ आरोग्यासाठी दररोज व्यायाम, योगा आवश्यक आहे.
- नामदेव जेनेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, वणी