६५ लाखांचा पथदिवे घोटाळा
By Admin | Updated: August 7, 2014 00:02 IST2014-08-07T00:02:32+5:302014-08-07T00:02:32+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना

६५ लाखांचा पथदिवे घोटाळा
जिल्हा क्रीडा कार्यालय : जिल्हाधिकाऱ्यांचीही दिशाभूल
सतीश येटरे - यवतमाळ
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येथील नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात ३१२ सौर पथदिवे लावण्यात आले. याची कुठलीही निविदा न काढता आणि तांत्रिक कामे करण्याचे अधिकार नसताना तज्ञाविनाच काम पूर्ण केले. यात ६४ लाख ५३ हजार ७२० रुपयांचे चढ्या दराने देयक काढून जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे, हे विशेष.
शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्हा प्रशासनाच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये आणि परिसरात सौर पथदिवे लावण्यात आले. येथील नेहरू स्टेडियममधील प्रांगणातही ३१२ सौर पथदिवे लावण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला काही अटी आणि शर्ती ठेऊन मंजूरात देण्यात आली. मंजुरातीनंतर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कामाची निविदा काढने गरजेचे होते. शिवाय हे काम १० लाखांवरील असल्याने शासनाच्या नियमाप्रमाणे जाहिरात देऊन निविदा मागवायला हव्या होत्या. मात्र तसे न करता विशिष्ट कंपन्यांचे कोटेशन घेण्यात आले. तसेच केंद्रातील एका मंत्र्याच्या संस्थेला हा कंत्राट परस्पर देण्यात आला. ३१२ लोखंडी पोल, तेवढ्याच बॅटरी आणि लाईट, केबल असे साहित्य त्यासाठी लागणार होते.
शेगाव येथील गजानन महाराज संस्थान निर्मिती करीत असलेल्या दर्जेदार सोलर पथदिव्याची किंमत ११ हजार रुपये आहे. असे असताना २२ हजार रुपयात एक सोलर पथदिवा याप्रमाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने मर्जीतील कंपनीला कंत्राट दिला. ३ फेब्रुवारीला या कामाचे आदेश काढण्यात आले तर २५ मार्चला देयकही देण्यात आले. ई-टेंडरींग अथवा निविदेची जाहिरात न देता अधिकाऱ्यांनी लाखोंचे कमीशन त्यामध्ये लाटल्याचे पुढे आले आहे.
विशेष असे की, वीज वितरण कंपनीचे अभियंता अथवा खासगी तज्ञाला यासाठी नेमावे लागते. मात्र कमिशनखोरी करताना त्याची अडचण निर्माण होईल म्हणून कुणालाच नेमले नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी हे पद तांत्रिक नाही त्यामुळे त्यांना विद्युत कामे करण्याचे अधिकार नाही. असे असताना हा प्रकार करण्यात आला.