६४ गावे टंचाईक्षेत्र घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 22:00 IST2018-02-09T22:00:17+5:302018-02-09T22:00:31+5:30
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.

६४ गावे टंचाईक्षेत्र घोषित
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असून फेब्रुवारी महिन्यातच आठ तालुक्यांची स्थिती बिकट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंचाई निवारण विभागाने जिल्ह्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले असून दुष्काळ निवारण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यात यंदा वार्षिक सरासरीच्या केवळ ६१ टक्के पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील जलस्रोत तळाला गेले असून भूजल पातळीही खालावत आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यातील १६३ गावांची भूजल पातळी दीड मीटरने खाली गेली आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीटंंचाई निवारण विभागाने यवतमाळ, कळंब, बाभूळगाव, आर्णी, राळेगाव, दारव्हा, वणी आणि नेर तालुक्यातील ६४ गावे टंचाई क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. यामुळे या गावात पाणीटंचाई समस्या सोडविण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जाणार आहे. या ६४ गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापर्यंत ६७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. आणखी २५० विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. परंतु गटविकास अधिकारी आणि तहसीलदारांकडून हे प्रस्ताव शासनाकडे पाठविले जात नाही, असा जिल्हा परिषद सदस्यांचा आरोप आहे. त्यावर उपाययोजना म्हणून खास दूत नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या. या दुतामार्फत प्रस्ताव निकाली काढले जाणार आहे.
जलप्रकल्पात केवळ २० टक्के पाणी
जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाण्याचा साठा झपाट्याने खाली जात आहे. सध्या या प्रकल्पांमध्ये केवळ २० टक्केच पाणीसाठा आहे. त्यात पूस प्रकल्प १८.७८ टक्के, अरुणावती प्रकल्प १२.०९ टक्के, बेंबळा प्रकल्प १६.०३ टक्के, अडाण प्रकल्प २०.३६ टक्के, नवरगाव प्रकल्प ३२.९२ टक्के, गोखी प्रकल्प ९.३२ टक्के, वाघाडी प्रकल्प ११.८२ टक्के, सायखेड प्रकल्प ५९.९० टक्के, अधरपूस ४५.५६ टक्के, बोरगाव १०.१४ टक्के तर ९१ लघु प्रकल्पांमध्ये २२.९८ टक्के जलसाठा आहे. तर तालुक्यातील गणेशपूर, करंजगाव, तोरनाळा, तेलगव्हाण, कोहळा, पांढरी, धानोरा, बोथ, ईचोरी, जांभुळणी, सारफळी, पेटूल, खरडगाव, झोंबाडी येथे टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.