पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२० तक्रारी
By Admin | Updated: May 23, 2015 00:22 IST2015-05-23T00:22:14+5:302015-05-23T00:22:14+5:30
पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ उपविभागीय जनता दरबारात ६२० तक्रारी दाखल झाल्या.

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२० तक्रारी
थेट संवाद : सर्वाधिक तक्रारी भूमिअभिलेखच्या
यवतमाळ : पालकमंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ उपविभागीय जनता दरबारात ६२० तक्रारी दाखल झाल्या. प्रत्येक तक्रारकर्त्याशी थेट संवाद साधत या तक्रारी तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात शुक्रवारी पालकमंत्री संजय राठोड यांच्या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी संतोष पाटील उपस्थित होते. सकाळी जनता दरबाराला प्रारंभ झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रत्येक तक्रारकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत तक्रारी निकाली काढण्याच्या सूचना केल्या. सर्वाधिक ६७ तक्रारी भूमिअभिलेख विभागाच्या होत्या. अनेक दिवसांपासून या विभागाची प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष अदालती घेण्याची सूचना केली. बहुतांश तक्रारी फेरफार वेळेवर मिळत नसल्याच्या होत्या. राजेश लुटे, दिनकर तोडे, छाया टोंगे, अमर काबरा या व्यक्तींचा प्रामुख्याने तक्रारकर्त्यांमध्ये समावेश होता.
यासोबतच तहसील कार्यालयाशी संबंधित ५६, पंचायत समिती ४१, जिल्हा परिषद २७, सामाजिक न्याय विभाग १५ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित ३० तक्रारींचा समावेश होता. या सोबतच जीवन प्राधिकरण, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, बांधकाम, पुनर्वसन, परिवहन, शिक्षण, पाणीपुरवठा, आरोग्य वने आदी विविध विभागांच्या तक्रारींचा समावेश होता. (शहर वार्ताहर)