नैसर्गिक आपत्तीने ६२ हजार शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:25 IST2018-09-20T22:24:38+5:302018-09-20T22:25:15+5:30
जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे.

नैसर्गिक आपत्तीने ६२ हजार शेतकरी अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात यावर्षी आलेल्या नैसर्गिक आपत्तीत ६२ हजार शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी व महसूल खात्याच्या संयुक्त पथकाने शासनाला सादर केला आहे. या नुकसानीच्या भरपाईसाठी ४५ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात जून, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने ६२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जून महिन्यात ७६२ हेक्टरला फटका बसला. ५०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. या क्षेत्राकरिता ४२ लाख ७९ हजार रुपयाची मागणी करण्यात आली आहे. जुलै महिन्यात सहा हजार ८६० शेतकºयांचे ३२६७ हेक्टरचे नुकसान झाले. याकरिता दोन कोटी २२ लाख १६ हजार रूपयांची मागणी करण्यात आली आहे. आॅगस्ट महिन्यात सर्वाधिक ५४ हजार ९८१ शेतकऱ्यांचे ४५ हजार ८८० हेक्टरचे नुकसान झाले. यामध्ये ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीची मागणी करण्यात आली आहे. त्याकरिता ४३ कोटी ९६ लाख ८७ हजार रुपयाची मागणी संयुक्त पंचनाम्यात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळेल काय?
पंतप्रधान पीक विमा योजनेत नुकसानग्रस्तांना २४ तासात २५ टक्के रक्कम अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात या आदेशाची अंमलबजावणीच झाली नाही. इतकेच नव्हे तर गतवर्षीच्या बाधीत शेतकऱ्यांना अजुनही मदत मिळाली नाही. अशा परिस्थितीत नव्याने नुकसानीचा सामना करणाºया शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार हा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.