आणेवारी ४४ टक्के
By Admin | Updated: November 15, 2014 02:07 IST2014-11-15T02:07:17+5:302014-11-15T02:07:17+5:30
जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत.

आणेवारी ४४ टक्के
यवतमाळ : जिल्ह्याची पीक आणेवारी अखेर ४४ टक्के निघाली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा १५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल करणार आहेत. आणेवारी ४४ टक्के निघाल्याने शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याची पीक परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यानंतरही पिकांची नजरआणेवारी तलाठ्यांनी ५४ टक्के काढली होती. या नजर आणेवारीवर आणि ती काढण्याच्या पद्धतीवर तीव्र टीका झाली. शेतकरी बुडला असताना आणेवारी ५४ टक्के कशी असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर प्रशासनाने सावधगिरीने पीक आणेवारी काढली. त्याला वास्तवतेचा टच दिला. शेतीच्या बांधावर जाऊन ‘लोकमत’ प्रतिनिधींनी वृत्तांकन केले. शेती आणि शेतकऱ्यांची वास्तव स्थिती उघड केली. त्याची दखल घेऊन अमरावतीचे विभागीय महसूल आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी थेट यवतमाळ जिल्ह्यातील शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी करीत शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली होती. त्यांनी वटफळी, कोलुरा, उत्तरवाढोणा, सोनखास, लासीना या गावांना भेटी दिल्या होत्या. त्यांनाही शेतकऱ्यांनी या तोट्याच्या शेतीचा हिशेब समजावून सांगितला. त्यानंतर वास्तव आणेवारीची चक्रे फिरली.
सुरुवातीला नजर आणेवारी ५४ टक्के होती आता ही आणेवारी ४४ टक्के निघाली आहे.त्यात सर्वात कमी ३६ टक्के आणेवारी ही नेर तालुक्याची तर सर्वात जास्त ४८ टक्के आणेवारी वणी तालुक्याची आहे. जिल्ह्यातील दोन हजार १४८ गावांपैकी दोन हजार ५० महसुली गावांची ही सरासरी ४४ टक्के आणेवारी काढली गेली आहे. यानंतर १५ जानेवारीला अंतिम पीक आणेवारी काढली जाणार आहे. त्यावेळीही आणेवारीची स्थिती हीच राहिल्यास शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश स्थितीतील सोईसुविधांचा लाभ मिळणार आहे. त्यात शेतसारा माफी, करमाफी, कृषीपंपाच्या वीज बिलात ३३ टक्के सवलत, पीक कर्जाचे रुपांतरण या सुविधा शासनाकडून दिल्या जातील. बँकेला सक्तीची कर्ज वसुली करता येणार नाही.
यावेळी ४४ टक्के निघालेली आणेवारी ही वास्तव आहे. प्रत्यक्षात शेतीची अवस्था या पेक्षाही वाईट आहे. शेतकऱ्यांना एकरी दोन क्ंिवटलही सोयाबीन झालेले नाही. कपाशीची अवस्थाही अशीच आहे. (शहर वार्ताहर)