सरपंच आरक्षण सोडत ३ व ५ एप्रिलला
By Admin | Updated: April 1, 2015 02:05 IST2015-04-01T02:05:09+5:302015-04-01T02:05:09+5:30
जिल्ह्यात होऊ घातलेल्या ५६६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण ३ आणि ५ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे.

सरपंच आरक्षण सोडत ३ व ५ एप्रिलला
यवतमाळ : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ५६६ ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाचे आरक्षण ३ आणि ५ एप्रिल रोजी जाहीर होणार आहे. यामधील २८३ जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहे. पुरूष गटातील सरपंचपदाचे आरक्षण तहसीलमध्ये तर महिलांचे आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात जाहीर होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मंगळवारपासून नामांकन आर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे. या स्थितीत सरपंचपदाचे आरक्षण काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. त्यावर निवडणुकीची रणनिती आखली जाते. उमेदवारी ठरविली जाते. त्यामुळे ३ आणि ५ एप्रिल रोजी जाहीर आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
पुरूष गटाचे आरक्षण ३ एप्रिलला तहसीलमध्ये जाहीर केले जाणार आहे. सकाळी १० पासून सोडतीला तालुकास्तरावर प्रारंभ होणार आहे. जिल्ह्यातील सरपंचपदाच्या एकूण जागांपैकी अर्ध्या जागा महिलांसाठी राखीव आहेत.
महिला सरपंचपदाचे आरक्षण ५ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जाहीर होणार आहे. या आरक्षणानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीला खरा रंग चढणार आहे. (शहर वार्ताहर)