३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद
By Admin | Updated: April 25, 2015 23:58 IST2015-04-25T23:58:48+5:302015-04-25T23:58:48+5:30
तालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद
पाण्यासाठी भटकंती : उमरखेड तालुक्यात कोट्यवधी पाण्यात
अविनाश खंदारे उमरखेड
तालुक्यातील १५ कोटी रुपयांच्या नळयोजनेचे तीनतेरा वाजले असून ७२ गावात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ३४ गावातील नळयोजना कायमस्वरूपी बंद असून अनेक नळयोजनांचे काम अपूर्ण आहे. परिणामी तालुक्यातील दीड लाख नागरिकांना आपली
तहान भागविण्यासाठी विहीर
आणि हातपंपाचा आधार घ्यावा लागतो.
जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत उमरखेड तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या नळयोजना राबविण्यात आल्या. परंतु पंचायत समितीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील अकोली, अंबाडी, बाळदी, बेलखेड, भवानी, बिटरगाव, भोजनगर, बोरगाव, बोरी, चातारी, बोथा, बिटरगाव बु., ब्राह्मणगाव, चातारी, चिखली, चिंचोली तांडा यासह अनेक गावात नळयोजना कार्यान्वित करण्यात आली. १५ कोटी रुपयांच्या या नळयोजनेकडे पंचायत समितीने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही योजना कुचकामी ठरली आहे.
अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीअभावी नळयोजनांचा बोजवारा उडाला आहे. एवढेच नाही तर बेलखेड, चिल्ली, देवसरी, पार्डी, पोफाळी, सावळेश्वर, बिटरगाव, भवानी, मुरली, पळशी, बाळदी, भांबरखेडा, सोनदाबी, हातला या गावातील सुमारे तीन कोटी रुपयांच्या नळयोजना कायमस्वरूपी बंद पडल्या आहे. त्याचप्रमाणे ढाणकी येथील नळयोजना बंद आहे. कारखेडला ४० लाख, भांबरखेडला आठ लाख, गोविंदपूर, मरसूळ, मुरली या गावांना आठ लाख असे ७२ लाख रुपयांची नळयोजनेची कामे अर्धवट आहे. या योजनावर उमरखेड पंचायत समितीने कुठलाही अंकुश ठेवला नाही. त्यामुळे या नळयोजना बंद पडल्या, तर काही अर्धवट स्थितीमुळे बंद आहे.
उमरखेड तालुक्याला यावर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. तालुक्यातील बंदी भागातील नागरिक पाण्यासाठी व्याकुळ झाले आहे.
लहान-सहान कारणाने अनेक नळयोजना बंद आहे. शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या नळयोजनेला चुना लागत आहे.
दीड लाख नागरिकांना हातपंपाचा आधार
उमरखेड तालुक्यात जवळपास ५३६ हातपंप आहे. त्यापैकी ३६ बंद आहे. उर्वरित हातपंपावर नागरिकांना आपली तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाईच्या काळात नागरिकांसाठी हातपंपच आधार ठरत आहे. नळयोजना दुरुस्तीसाठी कोणताही निधी दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना नाईलाजाने हातपंपाचे पाणी प्यावे लागत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.तालुक्यातील पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.
उमरखेड तालुक्यातील ७२ नळयोजनांपैकी ३४ नळयोजना बंद आहे. या नळयोजना सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यातील काही नळयोजनेच्या कामांना प्रारंभ झाला आहे. इतर सर्व नळयोजनेच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच कामाला प्रारंभ होईल.
- नीलेश काळबांडे,
उपअभियंता, पाणीपुरवठा, पुसद