पुसद तालुक्यात ३१३ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 05:00 IST2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:33+5:30
तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

पुसद तालुक्यात ३१३ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असतानाच तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्घवस्त झाली. यामध्ये गहू, हरभरा, संत्रा आदी पिकांचा समावेश आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असून बळीराजा पुन्हा हवालदिल झाला आहे.
तालुक्यात २८ मार्चला ०.४४ मिमी, २९ मार्च रोजी ४.६६ मिमी, तर ३० मार्चला ४.६६ मिमी पाऊस कोसळला. या तिन्ही दिवशी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वाºयाने त्यात भर घातल्याने ३१३.६ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. यंदा तालुक्यात आठ हजार ५७६ हेक्टरवर गहू, तर नऊ हजार ८४३ हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी झाली. ज्वारी ११२ हेक्टर, मका १०६ हेक्टर, तीळ १६ हेक्टर, संत्रा २५.३५ हेक्टर, भुईमूग १७२ हेक्टर, ऊस ५३७ हेक्टर, भाजीपाला ७४१ हेक्टर, फुलशेती ६.८० हेक्टर, तर हळद ५.२५ हेक्टरवर लागवड झाली. याशिवाय १७७ हेक्टरवर चारा पिके लावण्यात आली.
तीन दिवस कोसळलेल्या ७.४३ मिमी अवकाळी पाऊस व गारपिटीने १९ गावांमधील ३१३.६ हेक्टरवरील पिकांना फटका बसला. यामध्ये बोरी खुर्द, शेलू बु., वेणी, अश्विनपूर, मोहा, रामनगर, नंदपूर, शिवानगर, सावरगाव गोरे, नानंद (ई), नानंद खुर्द, जामनाईक क्र.१, जामनाईक क्र.२, पिंपळगाव, पारध, बान्शी, मुंगशी, वडगाव, शेलू खुर्द आदी गावांतील गहू २११ हेक्टर, हरभरा ३५ हेक्टर, संत्रा २१ हेक्टर, ज्वारी १७ हेक्टर, हळद ४ हेक्टर, फुलशेती ५ हेक्टर आदी २० हेक्टरवरील भाजीपाला पिके पूर्णत: उद्ध्वस्त झाली. या १९ गावांतील २९५ शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. तसेच रबी हंगामातील पिकांचे उत्पादन घटले असून नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडून मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार
तालुक्यात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे तहसीलदार प्रा.वैशाख वाहूरवाघ यांनी सांगितले. यात शेती व फळ पिकांचे ३३ टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या नुकसानीचा समावेश करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असेही तहसीलदार प्रा. वाहूरवाघ यांनी सांगितले.