जिल्ह्यातील २५६ डीपी बंद
By Admin | Updated: November 13, 2014 23:08 IST2014-11-13T23:08:59+5:302014-11-13T23:08:59+5:30
वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली.

जिल्ह्यातील २५६ डीपी बंद
केवळ ६२ चे काम सुरू : अधीक्षक अभियंत्यांची धक्कादायक माहिती
यवतमाळ : वीज वितरण कंपनीचे २५६ रोहित्र बंद असल्याची धक्कादायक माहिती खुद्द वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बाबासाहेब जाधव यांनी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत दिली. सिंचनाचा मुद्दा सदस्यांनी या बैठकीत उपस्थित करत सलग आठ तास कृषिपंपांना वीज पुरवठा द्यावा, अशी मागणी केली. त्यावेळी हे धक्कादायक वास्तव समोर आले.
खरिपाचा हंगाम पुरता बुडाल्याने शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांकडून रबीतील पीक घेण्यासाठी धडपड सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी अनधिकृतरित्याच एका कनेक्शनवर दोन ते तीन मोटरपंप बसविल्याचे वास्तवही आहे. अशाच काही कारणांमुळे जिल्ह्यातील कृषिपंपांना वीज पुरवठा करणारे २५६ रोहित्र बंद आहे. त्यापैकी केवळ ६२ रोहित्रांचे पैसे भरल्यामुळे बसवायची कार्यवाही सुरू असल्याचे अभियंता जाधव यांनी सांगितले. नियमाप्रमाणे वीज कंपनीने ४८ तासाच्या आत हे रोहित्र बसविणे बंधनकारक असल्याचीही पुष्टी जाधव यांनी या बैठकीत केली. ही धक्कादायक माहिती ऐकून स्थायी समितीत जिल्हा परिषद अध्यक्षासह उपस्थित सदस्यांना हादराच बसला. मात्र नियमांवर बोट ठेवून काम करणाऱ्या वीज कंपनीने
एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. आत्महत्या झाल्यानंतर शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याऐवजी शासनाने जळालेल्या विद्युत रोहित्रासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली.
वीज कंपनीकडून दिवसाला आठ तास वीज पुरवठा दिला जातो. मात्र हा वीज पुरवठा दोन टप्प्यात देण्यात येतो. त्यामुळे सिंचन करणे शक्य होत नाही. शेतकऱ्यांना सिंचनासाठी शेतमजूर मिळत नाही. वीज कंपनीने सलग आठ तास वीज पुरवठा दिल्यास मजुराकडून काम करून घेणे शक्य होईल ही अडचणही या बैठकीत अमन गावंडे यांनी मांडली.
या बैठकीत अमन गावंडे यांनी बाभूळगाव तालुक्यातील १३२ केव्हीच्या प्रस्तावित वीज उपकेंद्राचाही मुद्दा मांडला. बाभूळगाव येथील फिडरवर येणाऱ्या वाहन्या जंगलातून जातात. त्यामुळे लाईन ट्रिप झाल्यास तातडीने दुरुस्ती शक्य होत नाही. त्यासाठी ३३ केव्हीचे उपकेंद्र सरूळ येथे वाढविण्यात आले. मात्र या उपकेंद्रावर धामणगाव येथून वीज जोडणी देण्याऐवजी अतिरिक्त भार वाढविण्यात आला. या चुकीच्या कामामुळे कंत्राटदार कंपनीबाबत प्रचंड रोष निर्माण होत आहे. ही अडचण बैठकीत मांडताच वीज अभियंत्यांनीही सदर कंपनीवर कारवाई प्रस्तावित केल्याचे सांगितले. शिवाय बैठकीत नायगाव येथील नळजोडणीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. (कार्यालय प्रतिनिधी)