पुसदमध्ये २५२ जणांना ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST2020-04-20T05:00:00+5:302020-04-20T05:00:28+5:30

तालुक्यात ग्रामीण भागातील साडे तीन लाख नागरिकांसाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहरी भागातील दीड लाख लोकसंख्येसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतनगर व गढी वॉर्ड येथे दोन नागरी आरोग्य केंद्रे आहे. या सर्व ठिकाणी कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले. त्यात १८ एप्रिलपर्यंत २५२ तापाचे रुग्ण आढळले.

252 people fever in Pusad | पुसदमध्ये २५२ जणांना ताप

पुसदमध्ये २५२ जणांना ताप

ठळक मुद्देएकही पॉझिटिव्ह नाही : तालुक्यात नऊ कोरोना फिवर क्लिनिक स्थापन

प्रकाश लामणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : शासन व प्रशासन कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून उपाययोजना करीत आहे. यात तालुक्यात १० एप्रिलपासून नऊ ‘कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक’ उभारण्यात आले. या क्लिनिकमध्ये २५२ तापाचे रुग्ण आढळून आले. मात्र त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण नाही.
तालुक्यात ग्रामीण भागातील साडे तीन लाख नागरिकांसाठी सहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. शहरी भागातील दीड लाख लोकसंख्येसाठी उपजिल्हा रुग्णालय आणि वसंतनगर व गढी वॉर्ड येथे दोन नागरी आरोग्य केंद्रे आहे. या सर्व ठिकाणी कोरोना व्हायरस फिवर क्लिनिक स्थापन करण्यात आले. त्यात १८ एप्रिलपर्यंत २५२ तापाचे रुग्ण आढळले. उपजिल्हा रुग्णालयात ८०० पैकी ३५ रुग्ण, जांबबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात ५१४ पैकी ३८, चोंढी केंद्रात ६२१ पैकी ५५ रुग्ण, फेट्रा केंद्रात ४७७ पैकी ४४ रुग्ण, बेलोरा केंद्रात २८६ पैकी २८ रुग्ण, शेंबाळपिंप्री केंद्रात २८४ पैकी १४ रुग्ण, गौळ बु. केंद्रात २८८ पैकी ३६ रुग्ण, नागरी आरोग्य केंद्र क्रमांक १ मध्ये ९२ पैकी एक आणि नागरी आरोग्य केंद्र क्रमांक २ मध्ये १३२ पैकी एक असे एकूण २५२ रुग्ण तापाचे आढळले. त्यांना औषधी देण्यात आली. त्यांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तालुका कोरोना नियंत्रण समितीतर्फे येथे कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले. आयुर्वेद महाविद्यालयात ६० बेड, आसरपेंडच्या मुलींच्या निवासी शाळेत १०० बेड, तलाव ले-आऊटमधील मुलींच्या शासकीय वसतिगृहात २५ बेड आणि वरुडच्या आयटीआयमध्ये १५ बेडचे अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले. तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रा. वैशाख वाहूरवाघ, सचिव डॉ. आशिष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. दिनेश चव्हाण, डॉ. शरद ताटेवार, डॉ. अमोल पाटील आदींच्या नेतृत्वात वैद्यकीय पथके तयार करण्यात आली. ही पथके नऊही कोरोना फिवर क्लिनिकवर लक्ष ठेवून आहे. संशयित आढळल्यास त्वरित उपाययोजना केली जाणार आहे.

इसापूरच्या ‘त्या’ चार जणांना यवतमाळातून सुटी
तालुक्यातील इसापूर (धरण) येथील चार जणांना खोकल्याच्या त्रासामुळे शनिवारी रुग्णवाहिकेव्दारे यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ नेले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याने चारही जणांना रविवारी सुटी देण्यात आली.

त्यांना तीन दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवणार
नऊ फिवर क्लिनीक उभारण्यात आले असून आत्तापर्यंत २५२ रुग्ण तापाचे आढळले. त्यांना तीन दिवस वैद्यकीय निगराणीत ठेवले जाणार आहे. मात्र तालुक्यात सध्या एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष पवार यांनी केले.

होम क्वारंटाईन पूर्ण
ब्रिटन, नेपाळ, सौदी अरेबिया, दक्षिण अफ्रिका, दुबई आदी देशातून परत आलेल्या २६ नागरिकांचे होम क्वारंटाईन पूर्ण झाले. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाही. तथापि, लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे.

Web Title: 252 people fever in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.