२५० विद्यार्थिनींनी भोजन नाकारले
By Admin | Updated: August 27, 2015 00:02 IST2015-08-27T00:02:23+5:302015-08-27T00:02:23+5:30
आश्रमशाळांमध्ये बेचव जेवण मिळते, ही तक्रार नवीन नाही. पण, शासकीय आश्रमशाळेत पोळीमध्ये सोंडे, भातात अळ्या असाही प्रकार घडत आहे.

२५० विद्यार्थिनींनी भोजन नाकारले
शासकीय आदिवासी आश्रमशाळा : पोळीत सोंडे, भातात अळ्या आणि वरण पाण्यासारखे
अब्दूल मतीन पारवा
आश्रमशाळांमध्ये बेचव जेवण मिळते, ही तक्रार नवीन नाही. पण, शासकीय आश्रमशाळेत पोळीमध्ये सोंडे, भातात अळ्या असाही प्रकार घडत आहे. यामुळेच संतप्त २५० विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकत संताप व्यक्त केला. घाटंजी तालुक्याच्या जांब येथील शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या या प्रकारामुळे पालक आणि गावकऱ्यांमध्ये कमालीचा रोष व्यक्त होत आहे.
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी जांब येथे मुलींची निवासी आश्रमशाळा आहे. याठिकाणी ३८० विद्यार्थिनी राहतात. शासनाने ठरवून दिलेले जेवणाचे पदार्थ त्यांना कधीच मिळत नाही. याउलट निकृष्ट आणि आरोग्यासाठी घातक अशा प्रकारचे जेवण त्यांना दररोज घ्यावे लागते. बुधवारीही असाच प्रकार झाल्याने विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकला. दुपारी ३.३० वाजतापर्यंत त्यांनी वसतिगृहाच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या दिला. भातामध्ये आढळलेल्या अळ्या, पोळीमध्ये दृष्टीस पडलेले सोंडे यामुळे त्यांनी जेवण घेणे स्पष्ट नाकारले. वरणाचे पाणीच ताटात होते. वांग्याची भाजी होती. मात्र भाजी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले तिखटाचे पॅकिंग २०१२-१३ मधील होते. या वस्तूची मुदतही संपली होती, असे सांगण्यात आले. नवीन सत्र सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. या दिवसांमध्ये विद्यार्थिनींना सकाळच्या नाश्त्यात उसळ कधीही मिळाली नाही.
विद्यार्थिनींनी जेवणावर बहिष्कार टाकल्यामुळे पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचे मानकर आणि ढोले हे दोन कर्मचारी याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पुढे असा प्रकार होणार नाही, असे सांगून वेळ मारून नेली. मात्र आश्रमशाळेतील हा गोंधळ प्रकल्प कार्यालयाच्या निदर्शनास अनेकदा आणून दिलेला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
सुरक्षेचा प्रश्न वाऱ्यावर
जांब गावापासून अर्धा किलोमीटर दूर अंतरावर जंगलाला लागून ही आश्रमशाळा आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी कुठलीही सोय नाही. महिलांचे वसतिगृह असताना महिला अधीक्षकांची नियुक्ती नाही. कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांचा वापर अपवादानेच केला जातो. कार्यरत कर्मचाऱ्यांची अरेरावी सुरू असते.
आदिवासी विकासमंत्री ३० ला जिल्ह्यात येणार
राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा ३० आॅगस्ट रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. यावेळी त्यांच्यासमोर शासकीय व खासगी आदिवासी आश्रमशाळांमधील प्रश्न गाजणार आहे. विद्यार्थ्यांना सर्पदंश, निकृष्ट जेवण याकडे लक्ष वेधले जाईल.
शौचालय घाणीने माखलेले
या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या तुलनेत शौचालयांची संख्या अपुरी आहे. स्नानगृहाचीही परिस्थिती तिच आहे. घाणीने माखलेले शौचालय स्वच्छ करण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. अधीक्षक किंवा इतर कर्मचाऱ्यांकडे याविषयीची तक्रार केल्यास कारवाईचा धाक दाखविला जातो. शिवाय विद्यार्थिनीसाठी असलेल्या कक्षांमधील पंखे तकलादू आहे. काही ठिकाणी तर ही सोयच नाही.
शेंगदाणे-हरभरा जाळला
पहिली ते बारावीपर्यंत या वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनी आहे. त्यांच्यासाठी शेंगदाणे, हरभरा आदी वस्तूंचा पुरवठा केला जातो. परंतु कामाठी शाळेमध्ये उपलब्ध राहात नसल्याने विद्यार्थिनींना या वस्तूंचा आस्वाद घेता येत नाही. परिणामी कुजलेल्या या वस्तू जाळून टाकल्याचा प्रकारही आढळून आला. याही परिस्थितीत विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.