सिलिंडरसाठी २५ किलोमीटरचा प्रवास
By Admin | Updated: January 10, 2015 23:04 IST2015-01-10T23:04:15+5:302015-01-10T23:04:15+5:30
गॅस एजन्सी नसल्याने परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना सिलिंडरसाठी २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही एकाच फेरीत सिलिंडर उपलब्ध होईल याची शक्यता नसल्याने रिकाम्या

सिलिंडरसाठी २५ किलोमीटरचा प्रवास
अब्दुल मतीन - पारवा
गॅस एजन्सी नसल्याने परिसरातील ३० गावांमधील नागरिकांना सिलिंडरसाठी २० ते २५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यातही एकाच फेरीत सिलिंडर उपलब्ध होईल याची शक्यता नसल्याने रिकाम्या हातानेही परतावे लागते. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी पारवा येथे गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या भागातील विशेषत: पारवा गावातील बहुतांश नागरिकांकडे गॅस सिलिंडर आहे. त्यांना पांढरकवडा किंवा घाटंजी येथील एजन्सीशी जोडण्यात आले आहे. दोन ते तीन हजार नागरिकांपुढे रिकामे झालेले सिलिंडर भरून आणण्याचा प्रश्न आहे. पांढरकवडा येथे जोडलेल्या नागरिकांना २५ किलोमीटर तर घाटंजी येथे २२ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. एसटी बसमध्ये या ज्वालाग्राही वस्तूची वाहतूक करण्यास मनाई आहे. त्यामुळे खासगी वाहनांद्वारे किंवा दुचाकीने सिलिंडर संबंधित ठिकाणी घेवून जावे लागते. ही सर्व सर्कस केल्यानंतरही एजन्सीमध्ये तत्काळ भरलेले सिलिंडर उपलब्ध होईलच याची शक्यता नसते. अशावेळी रिकामे सिलिंडर घेवून परतावे लागते. पावसाळ्याच्या दिवसात तर मोठी सर्कस करावी लागते. दुचाकीने वाहतूक अशक्य होते तर खासगी वाहनांची संख्या कमी होते. तासंतास प्रतीक्षेनंतरही वाहन उपलब्ध होत नाही. अशावेळी रॉकेल किंवा जलतनाच्या आधारे स्वयंपाक करावा लागतो. पारवा येथे गॅस एजन्सीसाठी नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनीही ही बाब लावून धरली. परंतु प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. प्रवासासोबतच भाड्याचाही खर्च वाढतो. एका फेरीसाठी किमान १०० ते १२५ रुपये खर्च येत असल्याने सिलिंडरची किंमत ८०० ते ९०० रुपयांवर जाते. गावामध्ये काही ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या सिलिंडरसाठी हजार ते अकराशे रुपये मोजावे लागतात. ग्रामीण भागात जलतनासाठी सागवानासह इतर प्रकारच्या लाकडांचा वापर केला जातो. धुरामुळे त्यांना डोळ्यांचे आजार जडतात. यावर उपाय म्हणून अनुदानावर सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र पहिले सिलिंडर संपल्यानंतर दुसऱ्यासाठी त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. परिणामी सिलिंडर घराची शोभा वाढवित आहे.